भोपाळ - बागेश्वर धामचे प्रमुख धीरेंद्र शास्त्री आपल्या सत्संगातून, दरबारातून सनातन धर्माचा प्रचार करत असतात. सनातन आणि हिंदू राष्ट्राबद्दल ते दरबारातील भक्तांना मार्दर्शन करतात. त्यांचे हे व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल झाल्याचे पाहायला मिळते. त्यावरुन, अनेकदा टीकाही केली जाते. आता, पुन्हा एकदा धीरेंद्र शास्त्री यांनी सनातन धर्माची शिकवण सांगितलीय. राजधानी दिल्लीत घडलेल्या साक्षी हत्याकांडावर प्रतिक्रिया देताना धीरेंद्र शास्त्री यांनी संताप व्यक्त केला. तसेच, ही घटना पाहून आमच्यासारख्या तरुणांचं रक्त सळसळतं, असे त्यांनी म्हटलंय.
राजधानी दिल्लीत अंगावर थरकाप उडवणारी घटना घडली. साहिल नावाच्या मुलाने १६ वर्षीय मुलीची चाकू भोसकून आणि दगडाने ठेचून हत्या केली. या हत्येचे संपूर्ण देशात पडसाद उमटत आहेत. या घटनेवरुन देशात संतापाची लाट उसळली आहे. सोशल मीडियातून घटनेचा व्हिडिओ व्हायरल होत असून आरोपीला फाशीच्या शिक्षेची मागणी करण्यात येत आहे. आता, धीरेंद्र शास्त्री यांनीही या घटनेवर तीव्र शब्दात भावना व्यक्त केल्या आहेत.
लोकं मला म्हणतात की मी कट्टरवादी आहे, मी दंगल घडवणाऱ्या गोष्टी बोलतो. मग, आमच्या बहिणींचे असे हाल पाहून, जगात असा कुठला भाऊ असेल ज्याचं रक्त सळसळणार नाही. हे पाहून ज्याचं रक्त सळसळत नाही, तो जिवंत असूनही मेलेला आहे. म्हणून मी सनातनवर विश्वास करतो, कारण आमचा सनातन मारायचं नाही तर वाचवायचं काम करतो, अशी प्रतिक्रिया बागेश्वर धामच्या धीरेंद्र शास्त्री यांनी दिलीय.
केरळ स्टोरी चित्रपटावरुनही केलं होतं भाष्य
दरम्यान, यापूर्वी द केरळ स्टोरी चित्रपटावरुनही त्यांनी भाष्य केलं होतं. 'दे केरळ स्टोरी' या चित्रपटाची देशभरात चर्चा सुरू आहे. आता बागेश्वर धामचे पंडित धीरेंद्र शास्त्री यांनीही प्रतिक्रिया दिली आहे. शास्त्री म्हणाले, जे काही आहे ते चित्रपटात स्पष्टपणे दिसत आहे. आम्ही जे बोलत होतो ते चित्रपटात दाखवण्यात आले आहे. देशाच्या प्रबोधनासाठी अशा आणखी चित्रपटांची गरज आहे, असंही धीरेंद्र शास्त्री म्हणाले.