Dhirubhai Ambani Birthday: देशातील सर्वात मौल्यवान कंपनी असलेल्या रिलायन्स इंडस्ट्रीज लिमिटेडचा पाया रचणारे दिवंगत उद्योगपती धीरुभाई अंबानी (Dhirubhai Ambani) यांची आज जयंती आहे. आजही कॉर्पोरेट क्षेत्रात एंट्री घेणाऱ्या लोकांसाठी धिरुभाई एक आदर्श आहेत. खिशात 500 रुपये घेऊन मुंबई गाठलेल्या धीरुभाईंनी आपल्या क्षमतेच्या बळावर साम्राज्य उभे केले. त्यांच्या वाढदिवसानिमित्त मुकेश अंबानी यांची पत्नी नीता अंबानी (nita ambani ) यांनी धीरुभाईसाठी खास ओळी लिहिल्या आहेत.
नीता अंबानी यांचे सासऱ्यांसाठी खास ट्विटनीता अंबानी यांनी धीरुभाई अंबानी यांना त्यांच्या जयंतीनिमित्त सोशल मीडियावर एक भावनिक पोस्ट लिहिली आहे. ट्विटरवर धीरुभाईंचा फोटो शेअर करत लिहिले की, 'पप्पा, तुमची आज खूप आठवण येत आहे. आम्ही जेव्हा आमचे डोळे बंद करतो आणि प्रेरणेच्या शोधात असतो, तेव्हा फक्त तुम्ही दिसता.! त्या आठवणी आणि आम्हाला सक्षम करणासाठी धन्यवाद.'
वयाच्या 17 व्या वर्षी देश सोडलाभारतीय कॉर्पोरेट क्षेत्रात एक वेगळी ओळख निर्माण करणाऱ्या धीरुभाई अंबानी यांचे पूर्ण नाव धीरजलाल हिराचंद अंबानी होते. त्यांचा जन्म 28 डिसेंबर 1932 रोजी सौराष्ट्रातील जुनागड जिल्ह्यात झाला. दहावी पूर्ण केल्यानंतरच ते पैसे कमवण्यासाठी काम करू लागले आणि वयाच्या 17 व्या वर्षी आपल्या भावासोबत नोकरीसाठी येमेनला गेले.
रिलायन्सची सुरुवात 500 रुपयांपासून येमेनमधील एका पेट्रोल पंपावर महिना 300 रुपये पगारावर काही वर्षे काम केल्यानंतर ते भारतात परतले. यानंतर त्यांनी बाजाराची माहिती गोळा केली आणि मायानगर मुंबई गाठले. व्यवसाय करण्याच्या उद्देशाने आणि डोळ्यात मोठी स्वप्ने घेऊन ते मुंबईला पोहोचले तेव्हा त्याच्या खिशात फक्त 500 रुपये होते. या तुटपुंज्या रकमेच्या आणि खंबीर हिंमतीच्या जोरावर त्यांनी रिलायन्स कंपनी स्थापन करून भारतीय मसाले परदेशात पाठवायला सुरुवात केली आणि परदेशातून पॉलिस्टर भारतात आणायला सुरुवात केली. यातूनच रिलायन्सची सुरुवात झाली.
जुलै 2002 मध्ये निधन काही वेळातच रिलायन्सचा व्यवसाय प्रगती करू लागला आणि रिलायन्स हे नाव मोठे झाले. कंपनीच्या वेगवान वाढीसोबतच धीरूभाई अंबानी यांचे श्रीमंत होण्याचे स्वप्नही पूर्ण झाले आणि ते देशातील सर्वात श्रीमंतांच्या यादीत पोहोचले. धीरूभाई अंबानी यांचे 6 जुलै 2002 रोजी मुंबईतील रूग्णालयात त्यांच्या डोक्यातील रक्तवाहिनी फुटल्याने निधन झाले. यानंतर त्यांची कंपनी मुकेश अंबानी आणि अनिल अंबानी यांनी पुढे नेली. 500 रुपयांपासून सुरू झालेली ही कंपनी आज 17 लाख कोटींहून अधिक मार्केट कॅप असलेली फर्म बनली आहे.