नवी दिल्ली - शाळेमध्ये विद्यार्थ्यांना अनेक प्रश्न पडत असतात. शिक्षक विद्यार्थ्यांच्या प्रश्नाचं योग्य उत्तर देऊन निरसन करतात. मात्र याच दरम्यान एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे. एका सरकारी शाळेत संतापजनक प्रकार घडला आहे. विद्यार्थ्यांनी शिक्षिकेला प्रश्न विचारला म्हणून संतापलेल्या शिक्षिकेने संबंधित विद्यार्थिनींना चप्पलेने मारहाण केल्याची भयंकर घटना समोर आली आहे. शिक्षिकेने चपलेने मारल्यानंतर काही विद्यार्थिनींने चाइल्ड हेल्पलाईनकडे तक्रार दाखल केली, त्यानंतर ही घटना समोर आली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, राजस्थानातील धौलपूर जिल्ह्यातील एका सरकारी शाळेत हा धक्कादायक प्रकार घडला आहे. याप्रकरणी बाल कल्याण समितीचे सदस्य गिरीष गुर्जर यांच्या आदेशानंतर चाइल्ड हेल्पलाइनच्या टीमने संबंधित विद्यार्थींनीचं समुपदेशन केलं आहे. तसेच याप्रकरणी बाल कल्याण समितीने चौकशीचे आदेश दिले आहेत. मात्र प्रश्न विचारल्यामुळे शिक्षिकेने विद्यार्थिनींना मारहाण केल्याचं प्रकरण चर्चेचा विषय ठरत आहे. या घटनेची माहिती मिळताच शिक्षण विभागाचे उच्च अधिकारी संबंधित शाळेत दाखल झाले आहेत.
मुख्य जिल्हा शिक्षणाधिकारी सियाराम मीणा यांनी शाळेची पाहणी करून परिस्थितीचा आढावा घेतला आहे. शिक्षण विभागाच्या अधिकाऱ्यांनी विद्यार्थिनी, आरोपी शिक्षिका आणि सर्व कर्मचार्यांचे जबाब नोंदवले आहेत. शिक्षण विभागाच्या अधिकाऱ्यांनी शाळा प्रमुख आणि इतर कर्मचार्यांकडूनही माहिती गोळा केली आहे. शिक्षण विभागाकडून या प्रकरणाचा सखोल तपास सुरू आहे. मुख्य जिल्हा शिक्षणाधिकारी सियाराम मीणा यांनी हे प्रकरण खोटं असल्याचं म्हटलं आहे. परंतु काही मुलींनी तक्रार दाखल केल्यामुळे या प्रकरणाची गांभीर्याने चौकशी केली जाईल, असंही ते म्हणाले आहेत.
बाल कल्याण समितीचे सदस्य गिरीश गुर्जर यांनी दिलेल्या माहितीनुसार, समुपदेशन करताना मुलांची लेखी तक्रार प्राप्त झाली आहे. शाळेचे मुख्याध्यापक आणि शिक्षक संबंधित प्रकरण दाबण्यासाठी खोटं बोलत आहेत. त्यामुळे मुलांचं हित लक्षात घेवून संबंधित घटनेची माहिती जिल्हाधिकारी राकेश कुमार जायसवाल यांनाही देण्यात आली आहे. घटनेचं गांभीर्य लक्षात घेऊन जिल्हा शिक्षणाधिकारी यांना कारवाई करण्याबाबत पत्र लिहिलं जाईल. त्यानंतर दोषींवर कायदेशीर कारवाई केली जाईल असं देखील म्हटलं आहे. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे.