ऑनलाइन लोकमत
नवी दिल्ली, दि. ७ : टीम इंडियाचा वन डे कर्णधार महेंद्रसिंग धोनी गुरुवारी ३५ वर्षांचा झाला. वाढदिवसानिमित्त दिग्गजांसह चाहत्यांनी माहीचे अभिष्टचिंतन केले. धोनीला शुभेच्छा देणाऱ्यांमध्ये बीसीसीआय अध्यक्ष अनुराग ठाकूर, सचिन तेंडुलकर, वीरेंद्र सेहवाग, व्हीव्हीएस लक्ष्मण, बॉलिवूड सुपरस्टार अमिताभ बच्चन यांचा समावेश आहे.
ठाकूर आणि सचिन यांनी टिष्ट्वटरवर शुभेच्छा दिल्या तर सेहवागने दिलेल्या शुभेच्छा संदेशात माहीच्या हेलिकॉप्टर शॉटचे स्मरण करीत ७ जुलै यापुढे राष्ट्रीय हेलिकॉप्टर डे घोषित करण्याची मागणी केली. आयसीसीने टिष्ट्वटर हॅन्डलवर सर्वकालीन महान कर्णधारांपैकी एक असलेल्या माहीचे कौतुक केले. बच्चन यांनी ह्यहॅप्पी बर्थ डे एमएस!ह्ण असे संबोधले.
भारतीय वरिष्ठ तसेच अ संघातील अनेक खेळाडूंनी धोनीला शुभेच्छा दिल्या आहेत. सुरेश रैनाने आपल्या कर्णधाराला व्हिडिओ शेअर केला. त्यात माही बासरी वाजविताना दिसत आहे. येणाऱ्या अनेक वर्षांत तुझी चमक कायम राहील, अशा शुभेच्छा दिल्या. आयसीसीच्या तिन्ही मोठ्या स्पर्धा जिंकून देणारा धोनी एकमेव भारतीय कर्णधार आहे. त्याच्या नेतृत्वात २००७ मध्ये टी-२०विश्वचषक, २०११ मध्ये वन डे विश्वचषक आणि २०१३ साली चॅम्पियन्स ट्रॉफी जिंकली होती. भारतीय संघ कसोटीत नंबर वन बनला तो धोनीच्याच नेतृत्वात.
धोनीने आतापर्यंत २७८ वन डेमध्ये ८,९१८ धावा केल्या. त्यात नऊ शतके आणि ६० अर्धशतकांचा समावेश आहे. तो कसोटीतून निवृत्त झाला. माहीने ९० कसोटीत ४,८७६ धावा केल्या असून, त्यात सहा शतके आणि ३३ अर्धशतकांचा समावेश आहे. कसोटीत त्याच्या नावावर २५६ झेल आणि ३८ स्टम्पिंग आहेत.