ऑनलाइन लोकमत
नवी दिल्ली, दि. 25 - देशातील सर्वोच्च नागरिक पुरस्कार मानल्या जाणा-या पद्म पुरस्कारांच्या यादीमध्ये यंदा 120 जणांचा समावेश असल्याची माहिती मिळते आहे. या यादीत रिओ ऑलिम्पिकमध्ये सिल्व्हर मेडल पटकावणारी बॅडमिंटनपटू पी. व्ही. सिंधू आणि क्रिकेटर महेंद्र सिंह धोनी यांना पद्म श्री पुरस्कारानने सन्मानित करण्यात येणार असल्याची माहिती आहे. याशिवाय कुस्तीपटू साक्षी मलिक, पॅरालिम्पिक खेळाडू दीपा मलिका यांच्यासोबत गुगलचे सुंदर पिचाई, मायक्रोसॉफ्टचे प्रमुख सत्या नाडेला यांच्या नावाचाही समावेश आहे.
शिवाय राजकारणातील दिग्गज आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार, भाजपाचे वरिष्ठ नेते मुरली मनोहर जोशी, तर मनोरंजन क्षेत्रातील शंकर महादेवन, ऋषि कपूर, सोनू निगम, कैलाश खैर आणि मनोज वाजपेयी यांचा नावाचा समावेश असल्याची माहिती आहे. कला क्षेत्रात लक्ष्मी विश्वनाथन, बसंती बिष्ट, शिल्पकार मोहम्मद युसूफ खत्री, सीके नायर यांनाही पद्म पुरस्काराने गौरवण्यात येणार आहे.
या पद्म पुरस्कारांची घोषणा दरवर्षी प्रजासत्ताकदिनाच्या पूर्वसंध्येला केली जाते. 1954 सालापासून 4,329 नागरिकांना पद्म पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे.