नवी दिल्ली : लष्करात लेफ्ट. कर्नल या हुद्द्यावर असलेला क्रिकेटवीर एम. एस. धोनी अशांत काश्मीरमध्ये सैनिकांसह १६ दिवसांच्या मुक्कामात सीमेवर गस्त घालणे व पहारा देणे यासारख्या लष्करी सेवा बजावणार आहे. खेळातील नैपुण्याबद्दल सैन्यदलांमध्ये मानद पदांवर नेमलेल्यांपैकी सैन्यदलात अशी सेवा देणारा धोनी पहिला भारतीय खेळाडू असेल.
विश्वचषक क्रिकेट स्पर्धेनंतर निवृत्तीची चर्चा सुरू असलेल्या धोनीने वेस्ट इंडिज दौऱ्यातून स्वत:हून बाहेर राहण्याचे ठरविले. त्यामुळे ‘माही’ त्या काळात काय करणार याची उत्सुकता असतानाच लष्कराने ‘धोनी’च्या लष्करी सेवेच्या इनिंग्जची गुरुवारी घोषणा केली.भारतीय लष्कराने कळविले की, (मानद ) लेफ्ट. कर्नल एम. एस. धोनी ३१ जुलै ते १५ आॅगस्ट या काळात प्रादेशिक सेनेच्या १०६ व्या ‘पॅरा’ बटालियनसह काश्मीरमध्ये राहतील. ही बटालियन काश्मीरमध्ये ‘व्हेक्टर फोर्स’चा एक भाग आहे. या काळात धोनी गस्त घालणे वपहारा देणे अशी सक्रिय ड्युटी बजावेल. धोणी यांनी स्वत: अशी ड्युटी देण्याची विनंती केली होती व लष्करी मुख्यालयाने त्यास संमती दिली आहे.
भारतीय क्रिकेट संघाने विश्वचषक जिंकल्यानंतर २०११ मध्ये त्याला लष्करातील हे मानद पद बहाल करण्यात आले होते. हा हुद्दा मिळाल्यानंतर २०१५ मध्ये धोनीने आग्रा येथील प्रशिक्षण कॅम्पमध्ये लष्करी विमानांमधून ‘पॅराट्रुपर’ म्हणून प्रशिक्षण पूर्ण केले होते.आता निवृत्ती घेतलेल्या ‘मास्टर ब्लास्टर’ सचिन तेंडुलकरलाही भारतीय हवाई दलाने ‘ग्रुप कॅप्टन’चा मानद हुद्दा दिला आहे. मात्र सचिनचा सैन्यदलाशी फारसा सक्रिय संबंध नाही.