नवी दिल्ली : माकड हा माणसाचा पूर्वज कधीच नव्हता हे माझे विधान आज नाही पण दहा-वीस वर्षांनी तरी लोक नक्कीच मान्य करतील असे विधान करुन केंद्रीय मनुष्यबळ विकास खात्याचे राज्यमंत्री सत्यपालसिंग यांनी पुन्हा वादाचा धुरळा उडवून दिला आहे. निदान माझे पूर्वज तरी माकड नव्हते असेही ते म्हणाले. चार्ल्स डार्विनचा उक्रांतीवादाचा सिद्धांत चुकीचा असून शाळा, महाविद्यालयांच्या पाठ्यपुस्तकातून त्याचा उल्लेख काढून टाकावा अशी भूमिका सत्यपालसिंह यांनी याआधी मांडली होती. तिचीच री त्यांनी पुन्हा ओढली आहे.एका पुस्तक प्रकाशनाच्या कार्यक्रम शनिवारी बोलताना सत्यपालसिंह म्हणाले की, डार्विनचा सिद्घांताबद्दल मी मांडलेल्या भूमिकेला विरोध करणाऱ्यांनी शास्त्रीय पद्धतीने माझे म्हणणे खोडून काढलेले नाही. मी विज्ञान शाखेचाच विद्यार्थी होतो व रसायशास्त्रातून पीएचडी केलेली आहे.मुंबईचे माजी पोलिस आयुक्त असलेले सत्यपालसिंह म्हणाले की, मी सुशिक्षित राजकारणी आहे याचा मला अभिमान वाटतो. राष्ट्रवादी विचारांचे सरकार सध्या सत्तेत आहे ही जनतेसाठी अत्यंत भाग्याची गोष्ट आहे. ९९ टक्के पाठ्यपुस्तकांमध्ये हिंदु धर्माविषयी चुकीची माहिती देण्यात आली आहे. हे कसे पद्धतशीरपणे करण्यात आले याचे विश्लेषण करणारे पुस्तकच सध्या मी लिहित आहे. त्यातील विवेचनासाठी कोणत्याही पाश्चिमात्य विचारवंताच्या लेखनाचा आधार घेणार नाही. माझ्या मतांच्या पुष्ट्यर्थ सबळ पुरावेही या पुस्तकात देणार आहे. आपले मत योग्य आहे हे सिद्ध करण्यासाठी भारतातील साधूंनी इंग्लंडमधील एखाद्या प्राध्यापकाकडे धाव घेतली असे कधी झाले होते काय? असा प्रतिप्रश्नही सत्यपालसिंह यांनी विचारला.
निदान माझे पूर्वज तरी माकड नव्हते, सत्यपालसिंह यांचे पुन्हा वादग्रस्त वक्तव्य
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 01, 2018 11:44 PM