रशिया आणि युक्रेन युद्धात भारतातून मोठी बातमी येत आहे. या युद्धामुळे भारतीय जनता महागाईच्या आगीत होरपळत असताना आता त्याचा आणखी एक दुष्परिणाम समोर येऊ लागला आहे. या युद्धामुळे लाखो लोकांच्या नोकऱ्या धोक्यात आल्या आहेत.
युक्रेन-रशिया युद्ध आणखी काही महिने तरी चालणार आहे. यामुळे हिऱ्यांचा पुरवठा बाधित झाला आहे. सुरतमधील हिऱ्यांना पैलू पाडण्याचे काम करणाऱ्या कंपन्या, दुकानांनी जवळपास अडीज लाख कारागिरांना १५ दिवसांच्या सुटीवर जाण्यास सांगितले आहे. जगातील सर्वात मोठी हिऱ्यांचे उत्खनन करणारी कंपनी अलरोसामध्ये रशियाच्या सरकारचा मोठा हिस्सा आहे. अमेरिकेने ८ एप्रिलला या कंपनीवर निर्बंध लादले होते. यामुळे जगभरातील ३० टक्के हिऱ्यांचा पुरवठा ठप्प झाला आहे.
अमेरिकेने लावलेल्या बंदीमुळे भारताच्या हिरे निर्यातदारांवर याचा परिणाम झाला आहे. त्यांना या कंपनीकडून हिऱ्यांची खरेदी करता येत नाहीय. ते या कंपनीकडून पैलू न पाडलेले हिरे घेण्याची जोखीम या कंपन्या उठवू शकत नाहीत. कारण या हिऱ्यांचा अमेरिका सर्वात मोठा बाजार आहे.
गुजरातच्या डायमंड वर्कर्स युनियनचे अध्यक्ष रमेश जिलारिया यांनी सांगितले की, हिरे निर्मिती कंपन्या कामगारांच्या कामाचे तास कमी करत आहेत. १२ तासांवरून ते ८ तास करण्यात आले आहेत. तसेच आठवड्यातून दोन दिवसांची सुटी दिली जात आहे. सरकारने हस्तक्षेप केला तर परिस्थिती सुधारेल. कामगारांना १५ दिवसांच्या सुटीवर पाठविण्यात येत आहे. याची सुरुवात १६ मे पासून करण्यात आली आहे.
या काळात कारागिरांना पगार मिळणार नसल्याचे त्यांनी सांगितले. त्यामुळे उशिरा का होईना कामगारांना नोकरी गमवावी लागण्याची शक्यता आहे. सुरतच्या हिऱ्यांच्या युनिटमध्ये सुमारे दहा लाख लोकांना रोजगार मिळाला आहे.