पन्ना (मध्यप्रदेश) : विटांच्या छोट्या भट्टीवर काम करणाऱ्याला २६.११ कॅरेटचा हिरा सापडला असून, लिलावात त्याची किंमत १.२० कोटी रुपये येऊ शकेल, असे पन्नाचे हिरा अधिकारी रवी पटेल मंगळवारी म्हणाले. हा हिरा पन्ना जिल्ह्यातील एका उथळ खाणीत सापडला.
दाेन दिवसांत लिलावपन्ना गावात किशोरगंजचे रहिवासी सुशील शुक्ला आणि त्यांच्या भागीदारांना सोमवारी कृष्णा कल्याणपूर भागाजवळच्या खाणीत हा हिरा सापडला. येत्या एक दोन दिवसांत हिरा लिलावासाठी ठेवण्यात येईल. सरकारचे स्वामित्वधन (रॉयल्टी) आणि कर वळते करून घेऊन खाण कामगाराला पैसे दिले जातील, असेही पटेल म्हणाले.
१२ कॅरेटच्या हिऱ्यांचे भांडार राजधानी भोपाळपासून पन्ना जिल्हा ३८० किलोमीटर असून, तेथे अंदाजे १२ कॅरेटसच्या हिऱ्यांचे भांडार असल्याचा अंदाज आहे.
एवढा मोठा हिरा सापडण्याची पहिलीच वेळ
- छोट्या स्वरुपात वीटभट्टी भाड्याने चालवण्याचा व्यवसाय करणारे सुशील शुक्ला म्हणाले, “मी, माझे कुटुंब गेल्या २० वर्षांपासून हिरा खाण कामात असलो तरी, एवढा मोठा हिरा सापडण्याची ही पहिलीच वेळ आहे.
- जेथे हिरा सापडला ती खाण उथळ आहे. ती मी इतर पाच भागीदारांसोबत भाड्याने घेतली आहे.” या हिऱ्याला १.२० कोटी रुपयांपेक्षा जास्त रक्कम मिळेल, अशी आशा शुक्ला यांनी व्यक्त केली. हिऱ्याच्या लिलावातून आलेला पैसा मी व्यवसायात लावेन.