पाटणा - पाटणा सिटीमधील तख्त श्री हरमंदिरजी पाटणा साहिब येथे दान केलेले सुमारे पाच कोटी रुपयांचे हिरे, दागिने आणि सोन्याचे सामान नकली निघाले आहे.
या प्रकरणी पंचा प्यारांनी हे दान करणारे पंजाबमधील करतारपूर येथील रहिवासी डॉ. गुरविंदर सिंह सामरा यांना मनाई केल्यानंतरही माध्यमांमध्ये प्रतिक्रिया दिल्याप्रकरणी, तसेच तख्त श्री हरमंदिरजी पाटणा साहिब यांच्या गरिमेला ठेच पोहोचवल्याप्रकरणी कठोर कारवाई केली आहे.
त्यांना एक अखंड पाठ, ११०० चा कडाह प्रसाद आणि तीन दिवसांपर्यंत भांडी आणि चपला घरामध्ये सेवा करण्याचा आदेश देण्यात आला आहे. ही सुनावणी सुरू असताना डॉक्टर गुरविंदर सिंह सामरा यांचे पुत्र हरमनदीप सिंह सामना यांनी तख्त श्री हरमंदिरजी येथे जात आपली उपस्थिती लावली.
डॉक्टर सामरा यांनी १ जानेवारी २०२२ रोजी सुमारे ५ कोटी रुपये मूल्याचे हिरे आणि रत्नांनी बनवलेले सोन्याचे हार, सोन्याची कृपाण आणि सोन्यापासून तयार करण्यात आलेला छोटा पलंग आणि कलगी दान केली होती. नंतर शीख संगतांना संशय आल्याने या सामानाची तपासणी करण्यात आली. तेव्हा या सोन्याच्या शुद्धतेबाबत प्रश्नचिन्ह उपस्थित झाले. तसेच प्रत्यक्षात त्यामध्ये सोन्याचे प्रमाण फार कमी निघाले.