नवी दिल्ली-
पश्चिम बंगालमध्ये पोटनिवडणुकीच्या रणधुमाळीत तृणमूल काँग्रेसचे नेते आणि अभिनेते शत्रुघ्न सिन्हा यांनी मोदी सरकारवर जोरदार हल्लाबोल केला आहे. सिन्हा यांनी मोदी सरकारवर पेट्रोल-डिझेल आणि घरगुती गॅसच्या दरवाढीवरुन निशाणा साधला. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील सरकार अहंकारी आणि हुकुमशाही सरकार असल्याचं म्हटलं आहे.
सिन्हा यांनी यावेळी दिवंगत माजी पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांच्या आठवणी जागवल्या. "अटल बिहारी वाजपेयींच्या काळात आपण लोकशाही पाहिली आणि आता मोदींच्या काळात हुकुमशाहीचा अनुभव घेत आहोत", असं शत्रुघ्न सिन्हा म्हणाले. सिन्हा यांनी याआधी भाजपा आणि काँग्रेस या दोन्ही पक्षांसोबत काम केलं आहे. तसंच वाजपेयींच्या काळात ते केंद्रीय मंत्री देखील राहिले आहेत.
अभिनेते शत्रुघ्न सिन्हा १२ एप्रिल रोजी आसनसोलमधून तृणमूलच्या तिकिटावर पश्चिम बंगालची पोटनिवडणूक लढवत आहेत. "आपल्या मनाला येईल ते करायचं अशी हुकुमशाही प्रवृत्तीचं मोदी सरकार काम करत आहे. हे सरकार अहंकारी सरकार आहे", असं सिन्हा म्हणाले. "नऊ दिवसांत आठ वेळा इंधनाचे दर वाढवले हा अहंकारच आहे. तुम्ही याआधी कधी ऐकलं आहे का डिझेल आणि पेट्रोलचे दर नऊ दिवसांत आठ वेळा वाढले आहेत?", असंही ते म्हणाले.
पेट्रोल आणि डिझेलच्या दरात आज प्रत्येकी ८० पैशांनी वाढ झाली असून, गेल्या १० दिवसांत इंधनाच्या दरांमध्ये एकूण वाढ ६.४० रुपये प्रति लीटर वाढ झाली आहे.