चेन्नई विमानतळावर इंडिगोचा आपत्कालीन दरवाजा उघडल्याचे प्रकरण समोर आले आहे. हा दरवाजा उघडणारी व्यक्ती कर्नाटकातील भाजप खासदार तेजस्वी सूर्या असल्याचा आरोप होत आहे. भाजपच्या या तरुण नेत्याचे नाव समोर आल्यानंतर काँग्रेस आक्रमक झाल्याचे दिसत आहेत. कर्नाटक काँग्रेसने म्हटले आहे, जर एखाद्या नादान बालकाला सूट दिली तर काय होते? तेजस्वी सूर्या याचे उदाहरण आहेत. मुलाकडून विमानाचा आपत्कालीन दरवाजा उघडण्याचा प्रयत्न केला गेल्याचा प्रकार समोर आला आहे. प्रवाशांच्या जीवाशी असा खेळ का? काँग्रेसच्या आरोपानंतर आता नागरी विमान वाहतूक मंत्री ज्योतिरादित्य शिंदे यांनी उत्तर दिले आहे.
ज्योतिरादित्य म्हणाले, दरवाजा जानबुजून उघडण्यात आला नव्हता. दरवाजा चुकून उघडला गेला होता. त्यांनी त्यांची चूक कबूल केली आहे. विरोधक जे काही बोलत आहेत, त्यावर मी भाष्य करणार नाही.
काय आहे संपूर्ण प्रकरण? -गेल्या काही दिवसांपासून विमानात घडलेल्या घटना चर्चेत आल्या आहेत. अशाच प्रकारची एक घटना गेल्या वर्षी 10 डिसेंबर रोजी इंडिगोच्या फ्लाइटमध्ये घडली होती. एका प्रवाशाने चक्क विमानाचा आपत्कालीन दरवाजाच उघडला. यामुळे प्रवाशांमध्ये मोठा गोंधळ उडाला होता. हे विमान चेन्नईहून तिरुचिरापल्लीला जात होतं. याप्रकरणी नागरी विमान वाहतूक महासंचालनालयाने (DGCA) चौकशीचे आदेश दिले आहेत.
या प्रकरणात तेजस्वी सूर्याचे नाव -प्रवाशाच्या या कृत्यामुळे विमानाला दोन तास उशीर झाला. पण, इंडिगो 6E-7339 फ्लाइटनं तपासणीनंतर लगेचच उड्डाण केलं. त्यावेळेस विमान कंपनीनं प्रवाशाची माफी स्वीकारली, पण कोणतीही कारवाई केली नाही. डीजीसीएने याप्रकरणी चौकशीचे आदेश दिले, पण त्या व्यक्तीची ओळख गुप्त ठेवली. दरम्यान, डिसेंबर महिन्यात घडलेल्या या घटनेत भाजयुमो अध्यक्ष आणि खासदार तेजस्वी सूर्याचे नाव आले आहे. या विमानाचा दरवाजा तेजस्वी सूर्याने उघडल्याचा आरोप काँग्रेस, AIMIM आणि तृणमूल काँग्रेसने केला आहे.