Arvind Kejriwal Delhi Assembly Election 2025: दिल्लीचे माजी मुख्यमंत्री आणि आम आदमी पार्टीचे संयोजक अरविंद केजरीवाल यांनी भाजपवर गंभीर आरोप केला. दिल्लीतील मतदारांची नावे वगळ्याच्या प्रयत्नात असलेल्या भाजपच्या लोकांना रंगेहाथ पकडले असल्याचे केजरीवाल म्हणाले. केजरीवाल यांनी हरयाणा आणि महाराष्ट्र विधानसभा निवडणूक निकालावरही प्रश्नचिन्ह उपस्थित केले.
फेब्रुवारी २०२५ मध्ये दिल्ली विधानसभा निवडणूक होण्याचा अंदाज आहे. सत्ताधारी असलेल्या आम आदमी पार्टीने आतापासूनच निवडणुकीची तयारी सुरू केली आहे. पक्षाकडून काही उमेदवारही जाहीर करण्यात आले असून, अरविंद केजरीवाल दिल्लीतील मतदारसंघ पिंजून काढताना दिसत आहे.
मतदारांची नावे वगळण्याचा प्रयत्न, मोठा गौप्यस्फोट करणार -अरविंद केजरीवाल
अरविंद केजरीवाल यांनी सोशल मीडियावर एक पोस्ट केली आहे. केजरीवाल यांनी दिल्लीत भाजपच्या लोकांकडून मतदारांची नावे वगळण्यासाठी अर्ज दाखल केले जात असल्याचा खळबळजनक दावा केला आहे.
"दिल्लीत भाजप मोठ्या प्रमाणात लोकांची मते कापण्याचा प्रयत्न करत असताना रंगेहाथ पकडण्यात आले आहे. भाजपने हजारो मतदारांची नावे वगळण्यासाठी अर्ज दाखल केले आहेत. यावर लवकरच मोठा खुलासा करेन", असे केजरीवाल म्हणाले.
"हे लोक हरयाणा आणि महाराष्ट्रातील निवडणुकाही अशाच पद्धतीने जिंकले आहेत का? भाजपवाल्यानो, दिल्लीत तुमचं षडयंत्र यशस्वी होऊ देणार नाही", असे म्हणत केजरीवाल यांनी भाजपवर गंभीर आरोप केला आहे.
महाराष्ट्रातही चर्चिला गेला मतदारांची नावे वगळण्याचा मुद्दा
राज्यात विधानसभा निवडणूक जाहीर झाल्यानंतर काँग्रेसने मतदारांची नावे परस्पर वगळण्याचा मुद्दा उपस्थित केला होता. महाविकास आघाडीच्या नेत्यांनी निवडणूक आयोगाकडे तक्रारही केली होती.
महाविकास आघाडीचे जे मतदार आहेत, त्यांची नावे मतदार यादीतून वगळली जात असल्याचा आरोप काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोलेंनी केला होता. तोच मुद्दा आता दिल्लीत अरविंद केजरीवालांनी उपस्थित केला आहे.