ऑनलाइन लोकमत
मुंबई, दि. २ - मी पंतप्रधान नरेंद्र मोदींची उघडपणे स्तुती करतो म्हणून मला पाकिस्ताननं व्हिसा नाकारला का? मी काश्मिरी पंडीत आहे, आणि पाकिस्तानला अडचणीचं ठरेल असं काही बोलेन म्हणून व्हिसा नाकारला का? असे प्रश्न माझ्या मनात येतात असं अनुपम खेर यांनी म्हटलं आहे.
पाकिस्ताननं अनुपम खेर यांनी व्हिसासाठी अर्जच केला नव्हता अशा प्रकारचं स्पष्टीकरण पाकिस्तानी कौन्सुलेटनं दिलं असेल तर ते खोटं असल्याचं खेर म्हणाले. मी पाकिस्तानमध्ये मी लिहिलेल्या पुस्तकाची चर्चा करणार होतो आणि त्यासाठी कराची लिट फेस्टिवलच्या आयोजकांनी मला बोलावलं होतं असं खेर म्हणाले. व्हिसासाठी मी नाही तर कराची लिट फेस्टिवलच्या आयोजकांनी माझ्यासाठी अर्ज केला होता असं सांगताना १८ जणांपैकी केवळ मलाच व्हिसा मिळाला नाही, याचा अर्थ काय होतं असा प्रश्न त्यांनी विचारला आहे.
मी सहिष्णूता, असहिष्णूता यावर बोलणार नव्हतो किंवा काश्मिर प्रश्नावर मनं तोडणारं बोलणार नव्हतो, तर मनं जोडण्यासाठी जाणार होतो असं सांगताना अनुपम खेर यांनी कलाकारांना सीमा नसाव्यात, त्यांना आडकाटी नसावं असं मत व्यक्त केलं.
गुलाम अलींच्या भारतभेटीचं आपण स्वागतच करतो असं ते म्हणाले. मुंबईत गुलाम अलींना विरोध झाला, तर कोलकाता येथे लाखाच्या संख्येनं गुलाम अलींची मैफिल रंगली, हे भारताचं खरं रूप आहे असं खेर म्हणाले.
पाकिस्तानी कलाकार भारतात येतात, त्याबद्दल माझी काहीच हरकत नाहीये, कलेच्या क्षेत्रात अशी देवाणघेवाण व्हायलाच हवी असंही खेर यांनी स्पष्ट केलं. माझ्या न जाण्यामुळे ज्यांनी ज्यांनी माझ्यासाठी पाकिस्तानमध्ये विविध कार्यक्रमांचं आयोजन केलं होतं, त्यांच्यासाठी मला वाईट वाटत असल्याचं खेर म्हणाले.