भोपाळ : ‘मला कधीही वडिलांचे प्रेम मिळाले नाही. माझी कोणी काळजी केली नाही. मी अंतर्मुख बनलो’, असा दावा ३३ ट्रकचालक व त्यांच्या मदतनिसांची हत्या करणाऱ्या आदेश खामरा याने चौकशी अधिकाऱ्यांकडे केला आहे.‘मी मोठा झालो व हिंसक बनलो तेव्हा माझ्यात इतक्या खोलवर संताप आहे याची जाणीव मला झाली नव्हती’, असे खामरा याने पोलीस अधीक्षक (दक्षिण) लोढा राहुल कुमार यांना सांगितले. पोलीस मात्र तो जे सांगतो आहे त्यावर विश्वास ठेवत नाहीत. खामरा हा अतिशय चलाख असल्याचे चौकशीत आढळले. त्याने ज्यांच्या हत्या केल्या त्यांच्याशी तो खूप सहजपणे मैत्री करायचा तो याच चलाखीच्या कौशल्यावर. आदेश खामराचे वडील गुलाब खामरा हे लष्करातून नायब सुभेदार म्हणून निवृत्त झाले व त्यांनी घरात लष्करी शिस्त निर्माण केली. ‘मी लहान असताना वडील माझ्याशी खूप कठोरपणे वागायचे. ते मला मारायचे व अतिशय किरकोळ गोष्टीवरून ते मला घराबाहेर फेकायचे’, असे आदेश याने सांगितल्याचे लोढा यांनी सांगितले. लहानपणी आघात सहन केलेल्या आदेशमध्ये हिंसक मानसिकता बळावली व त्यातूनच त्याने अतिशय थंडपणे हत्या केल्या व त्याबद्दल त्याला पश्चात्तापही होत नाही. तो खूप धूर्त असल्यामुळे त्याने सांगितलेल्या सगळ्या गोष्टींची आम्ही खात्री करून घेत आहोत, असे लोढा कुमार म्हणाले.या हत्या त्याने २०१० पासून सुरू केल्याचे याआधी सांगितले गेले होते; परंतु त्याच्या गुन्हेगारीचे पाऊल २००५-२००६ मध्ये त्याने खंडणी मागून सुरू केल्यापासून पडले आहे.
33 जणांची हत्या करणारा म्हणतो, वडिलांचे प्रेम मिळाले नाही
By ऑनलाइन लोकमत | Published: September 14, 2018 1:18 AM