ऑनलाइन लोकमत
चंदीगड, दि. ५ - पठाणकोट येथील भारतीय हवाई दलाच्या तळावर झालेल्या दहशतवादी हल्ल्यामुळे सुरक्षाव्यवस्थेतील अनेक गंभीर त्रुटी समोर आल्या आहेत. भारताच्या हद्दीत घुसल्यानंतर या अतिरेक्यांनी सर्वप्रथम गुरुदासपूरचे पोलिस अधीक्षक सलविंदर सिंग यांचे अपहरण केले नंतर काहीवेळाने त्यांना सोडून दिले. हा हल्ला जैश ए मोहम्मद या दहशतवादी संघटनेच्या अतिरेक्यांनी केल्याची शक्यता गुप्तचर यंत्रणांनी व्यक्त केली आहे.
या घटनेसंदर्भात खासगी वृत्तवाहिनीशी बोलताना सलविंदर सिंग म्हणाले की, ३१ डिसेंबरच्या रात्री मी पाकिस्तानच्या सीमेजवळ असणा-या गुरुव्दारा येथे दर्शनासाठी चाललो असताना अतिरेक्यांनी आमच्या गाडीचा मार्ग रोखला.
गाडीतून उतरल्यानंतर त्यांनी माझे हात-पाय बांधले, डोळयावर पट्टी बांधली होती. रात्रीचीवेळ असल्याने नेमके किती अतिरेकी होते ते ओळखता आले नाही असे त्यांनी सांगितले.
अपहरण झाले त्यावेळी निळा दिवा असलेली सरकारी गाडी माझ्याकडे होती. पण मी गणवेश परिधान केला नव्हता. त्यामुळे त्यांना मी पोलिस अधिकारी असल्याचे ओळखता आले नाही. निघताना ज्यावेळी त्यांना मी पोलिसात असल्याचा अंदाज आला तेव्हा त्यांनी कोणाला माहिती दिली तर गंभीर किंमत चुकवायला तयार रहा असा मला इशारा दिला होता असे सलविंदर सिंग यांनी सांगितले.
अतिरेक्यांकडे एके-४७ रायफल्स होत्या, ते उर्दू, हिंदी आणि पंजाबी भाषेमध्ये बोलते होते अशी माहिती सलविंदर यांनी दिली. सलविंदर यांचे अपहरण केले त्यावेळी आणखी दोन जण त्यांच्यासोबत होते. जे मी सांगतोय ते खोटे असेल तर, मला फासावर लटकवा असे सलविंदर सिंग यांनी सांगितले.
एनआयएच्या अधिका-यांनी काल सलविंदर यांची सहातास कसून चौकशी केली. आजही सलविंदर आणि त्यांच्यासोबत गाडीत असलेल्या दोघांची चौकशी होणार आहे. हल्ला झालेल्या पठाणकोटच्या हवाई तळापासून सलविंदर यांची गाडी ५०० मीटर अंतरावर सापडली होती.