खरेच फ्लाइंग किस दिले का? भाजपच्या २२ महिला खासदारांची लोकसभा अध्यक्षांकडे तक्रार
By ऑनलाइन लोकमत | Published: August 10, 2023 06:19 AM2023-08-10T06:19:46+5:302023-08-10T06:20:12+5:30
भाजप खासदार हेमा मालिनी यांनी संसदेत असे काही झालेच नसल्याचे सांगत स्मृती इराणींच्या दाव्यातील हवाच काढली.
- संजय शर्मा
लोकमत न्यूज नेटवर्क
नवी दिल्ली : काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांनी संसदेत फ्लाइंग किस देण्याचा आरोप करत भाजपच्या २२ महिला खासदारांनी लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांच्याकडे पत्राद्वारे तक्रार केली आहे. यामुळे राहुल गांधी यांचे खरे चरित्र बाहेर आले, असे भाजप नेत्यांनी म्हटले आहे. मात्र भाजप खासदार हेमा मालिनी यांनी संसदेत असे काही झालेच नसल्याचे सांगत स्मृती इराणींच्या दाव्यातील हवाच काढली.
काँग्रेस म्हणते...
काँग्रेसच्या नेत्यांनी सांगितले की, राहुल गांधी यांनी कोणालाही फ्लाइंग किस दिलेले नाही. त्यांच्या हातून काही कागदपत्रे पडली होती. ती उचलत असताना त्यांच्या हाताकडे पाहून असे वाटले असावे. तसेही भाजपचे सरकार राहुल गांधी यांना संसदेत पाहू इच्छित नाही.
मणिपूरमध्ये शांतता प्रस्थापित व्हावी
मणिपूरमध्ये महिलांवर झालेले अत्याचार अत्यंत वेदनादायी आहे. सरकारने तातडीने लक्ष घालून तिथे शांतता प्रस्थापित करण्यासाठी पुढाकार घ्यावा. तेथील हिंसाचार थांबायला हवा, महिलांसाठी सुरक्षित वातावरण निर्माण व्हायला हवे. मणिपूर लहान राज्य असले तरी तो देशाचा अविभाज्य भाग आहे. राजकारण बाजूला ठेवून सरकारने तिथे शांतता प्रस्थापित करावी.
पंतप्रधानांना हटवणे सोपी गोष्ट नाही
केंद्रातील मोदी सरकारने शेतकऱ्यांना मोठ्या प्रमाणात मदत केली. त्यामुळे पंतप्रधान नरेंद्र मोदी हे देशातील १४० कोटी लोकांच्या हृदयात आहे. विरोधकांनी कितीही प्रयत्न केले, तरी मोदींचे काहीही बिघडवू शकत नाही. त्यांना हटवणे सोपी गोष्ट नाही. जनता दल, राष्ट्रीय जनता दलात केवळ घराणेशाहीलाच प्राधान्य दिले जात असल्याने मी त्यांना रामराम ठोकला.
त्यांना माहिती आहे काही फायदा नाही, तरीही...
विरोधकांनी आणलेला अविश्वास प्रस्ताव हा आधारहीन असल्याची जाणीव त्यांनाही आहे. २०१८ मध्येही विरोधकांनी निवडणुकीच्या एक वर्षापूर्वी अविश्वास प्रस्ताव आणला होता. यावेळीही तेच झाले आहे. निवडणुकीपूर्वी अविश्वास प्रस्ताव आणून आगामी निवडणुकीत फायदा होईल, असे विरोधकांना वाटते, पण ते अशक्य आहे.
आज मणिपूर जळतेय, उद्या संपूर्ण ईशान्य जळेल
मणिपूरमध्ये उद्भवलेली परिस्थिती अत्यंत भयावह आहे. तुम्ही मणिपूरच्या मुद्द्याला सहजतेने घेऊ शकत नाही. सरकारला अद्याप तेथील गांभीर्य कळालेच नाही. आम्ही तेथील परिस्थिती पाहून आलोय. आज मणिपूर जळत आहे, उद्या मिझोरम जळेल, परवा नागालँड जळेल आणि त्याचा परिणाम संपूर्ण ईशान्य भारतावर होईल.
डबल इंजिन सरकार फेल ठरले
तीन महिन्यांपासून मणिपूर धगधगत असताना केंद्र सरकार एवढे शांत का आहे? तेथील प्रश्न सोडवण्यासाठी ते पुढाकार का घेत नाही. मणिपूरमधील डबल इंजिन सरकार परिस्थिती हाताळण्यात अपयशी ठरले आहे. शासकीय शस्रागारातून शस्त्रास्त्रे चोरली जात असताना राज्य सरकार काय करत आहे? केंद्रानेही त्याकडे दुर्लक्ष करून त्यावर पडदा टाकण्याचा प्रयत्न केला.
न्यायालयाने हस्तक्षेप केल्यावर तरी जागे व्हा
मणिपूरमधील हिंसाचार रोखण्यासाठी सरकार इतके अपयशी ठरले, की कोर्टाला हस्तक्षेप करावा लागला. ही गोष्ट तुमच्यासाठी लाजिरवाणी नाही का? किमान आता तरी जागे व्हा. तीन महिन्यांपासून तेथे खून, बलात्कार, हिंसाचार होत आहे. मणिपूरमध्ये लोकसंख्येच्या तुलनेत अधिक सुरक्षादले तैनात केले असतानाही तेथील परिस्थिती नियंत्रणात आलेली नाही.