एकदाच नसबंदी केली, दोनदा पगारवाढ लाटली; मध्यप्रदेशच्या सरकारी कर्मचाऱ्यांचे प्रताप
By ऑनलाइन लोकमत | Published: October 23, 2019 12:06 PM2019-10-23T12:06:39+5:302019-10-23T12:07:21+5:30
मध्य प्रदेशमध्ये सध्या आमदार, सचिव आणि मोठमोठे अधिकारी सेक्स स्कँडलमध्ये आणि हनी ट्रॅपमध्ये अडकल्याने वातावरण तापलेले आहे.
मध्यप्रदेशच्या विधानसभेमध्येच मोठा भ्रष्टाचार समोर आला आहे. विधानसभेच्या सचिवापासूनच्या अधिकाऱ्यांनी एकदाच नसबंदी करत दोनवेळा पगारवाढ लाटल्याचा प्रकार घडला आहे. नियमानुसार नसबंदी केल्यानंतर एक पगारवाढ देण्यात येते.
मध्य प्रदेशमध्ये सध्या आमदार, सचिव आणि मोठमोठे अधिकारी सेक्स स्कँडलमध्ये आणि हनी ट्रॅपमध्ये अडकल्याने वातावरण तापलेले आहे. अशातच विधानसभेतील अधिकारीही सरकारला फसवत महसूल लुटत असल्याचे समजले आहे. या अधिकारी, कर्मचाऱ्यांनी वेतन वाढ घेतानाच वैद्यकीय खर्चाची बिले अवाच्या सव्वा वाढविली आहेत. धक्कादायक बाब म्हणजे यामध्ये अप्पर सचिव, उप सचिव या दर्जाच्या अधिकाऱ्यांसह 35 जणांचा सहभाग आहे. या कर्मचाऱ्यांना एकूण 40 लाख रुपयांचा भरणा करण्याची नोटीस पाठविण्यात आली आहे.
विधानसभेतून वेतन निश्चितीसाठी सर्व कर्मचाऱ्यांचे सेवा पुस्तक कोषागार विभागाला पाठविण्यात आले होते. यावेळी या अधिकाऱ्यांच्या वेतनामध्ये गडबड आढळून आली. या घोटाळ्यामुळे या कर्मचाऱ्यांनी लाटलेले पैसे परत करावे लागणार असून पेन्शनपासूनही मुकावे लागण्याची शक्यता आहे. काही कर्मचाऱ्यांनी तर दोनवेळा नसबंदी केल्याची प्रमाणपत्रे जोडली आहेत. प्रत्यक्षात एकदाच नसबंदी केली होती.
काही सचिव दर्जाच्या अधिकाऱ्यांनी वैद्यकीय बिलेही जादा रकमेची जोडली आहेत. त्यांनी पत्नीच्या नावावर दर महिन्याला मेडिकल बिले जोडली आहेत. वेतन आणि मंजूर रक्कम यापेक्षा या बिलांची रक्कम जास्त होत आहे. त्यांच्याकडूनही वसुली करण्यात येणार आहे.