नवी दिल्ली - पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते 11 जुलै रोजी नवीन संसदेच्या इमारतीवरील राष्ट्रीय प्रतिक अशोक स्तंभाचे (National Emblem Ashok Stambh) अनावरण करण्यात आले. मात्र, या अशोक स्तंभावर असलेल्या सिंहाच्या चेहऱ्यावरील भावमुद्रेवरून (Ashok Stambh) वाद निर्माण झाला आहे. भाजपच्या नेतृत्वातील केंद्र सरकारवर अशोक स्तंभावरुन विरोधकांनी टीकेची झोड उठवली आहे. सोशल मीडियावरही अनेकांनी याबाबत नाराजी व्यक्त केली आहे. आता, याबाबत शिल्पकार सुनिल देवरे यांनी बाजू मांडली. तसेच, कुठलाही बदल यात केला नसल्याचंही ते म्हणाले.
नवीन संसद इमारतीवरील अशोक स्तंभाच्या लोकार्पण कार्यक्रमासाठी विरोधी पक्षाांना आमंत्रित करण्यात आले नव्हते. याबद्दलही आक्षेप घेण्यात आला आहे. भारताचे राष्ट्रीय प्रतिक असलेल्या अशोक स्तंभावरील सिंहाची भावमुद्रा ही शांत, संयमी असल्याचे दिसते. तर, नवीन मुद्रा ही आक्रमक आणि क्रोधित असल्याचा आक्षेप घेण्यात आला आहे. यासंदर्भात बोलताना, शिल्पकार सुनिल देवरे यांनी बाजू सांगितली. तसेच, आम्ही मूर्ती घडविताना मोठा रिसर्च केल्याचंही त्यांनी सांगितलं.
प्रत्येक अँगलने ह्याचा फोटो घेतल्यास तो वेगवेगळा वाटणार. आपण दूरू राहून याचा फोटो घेतला किंवा पाहिलं तर ते पूर्णपणे अशोक स्तंभातील सिम्बॉलशी मॅच करते. आम्ही या प्रतिकृतीच्या डिटेल्सवर अधिक लक्ष केंद्रीत केलं. कारण, हे दूरुन पाहण्यात येणार आहे. राष्ट्रपती भवनच्या डोमवरही एक असेच शिल्प लावण्यात आले आहे. पण, ते लहान असल्याने त्याचे डिटेल्स दिसून येत नाहीत, असे या शिल्पाचे शिल्पकार सुनिल देवरे यांनी म्हटले.
मूळ शिल्प हे 2 ते 3 फूट एवढेच आहे, तर सध्याचे हे शिल्प 7 मीटर उंच असल्याने ह्यामध्ये फरक दिसून येतो. सम्राट अशोकांनी हे चार सिंहच का निवडले असतील, यातून नेमका काय संदेश द्यायचा असेल. जगात यापेक्षा जास्त मोठा शांतीचा संदेश असूच शकत नाही, की चार सिंह एकत्र येऊन शांतीचा संदेश देत आहेत. त्यामुळे, हा विचार लक्षात घेऊनच आम्ही ही कलाकृती बनवली आहे, असे सुनिल चवरे यांनी एका एनडीटीव्ही या टीव्ही माध्यमाशी बोलताना म्हटले.
आपचे नेते अन् इतरांनीही घेतला आक्षेप
आम आदमी पक्षाचे नेते संजय सिंह यांनी राष्ट्रीय प्रतिक बदलण्यात आला असल्याचा आरोप केला आहे. राष्ट्रीय प्रतिक बदलणाऱ्यांना राष्ट्रद्रोही का म्हणू नये असा सवाल त्यांनी ट्वीटवर विचारला आहे. विचारवंत, लेखक दिलीप मंडल यांनीदेखील नवीन संसद इमारतीवर असलेल्या अशोक स्तंभाबाबत प्रश्न उपस्थित केले आहेत. अशोक स्तंभाचे मूळ स्वरुप सारनाथ येथील संग्रहालयात आहे. राष्ट्रीय प्रतिकाचा फोटो पोस्टाचे तिकिट, सरकारी दस्ताऐवजात उपलब्ध असल्याचे त्यांनी सांगितले. यामध्ये अशोक स्तंभावरील सिंह हा शांत असलेल्या भावमुद्रेत आहे.
या शिल्पाची वैशिष्ट्येउंची : २६ फूट व्यास : ११ फूटवजन : ९ टन धातू : ब्राँझ स्ट्रक्चरल डिझाइन : धनश्री काळे, वास्तुविशारद, औरंगाबाद