एस. पी. सिन्हापाटणा :
बिहारचे वरिष्ठ आयएएस अधिकारी आनंद किशोर यांना अनुचित ड्रेस कोडबाबत पाटणा हायकोर्टाचे न्यायाधीश पी. बी. बजंथरी यांनी चांगलेच फटकारले. एका प्रकरणात आनंद किशोर हायकोर्टात हजर झाले होते. परंतु, त्यांनी ड्रेस कोडचे पालन केले नव्हते व पूर्ण बाह्याचे शर्टही परिधान केले नव्हते. न्यायाधीशांनी फटकारल्याचा व्हिडिओ व्हायरल होत आहे.
ऑक्टोबर २०२१ मध्ये कर्नाटक उच्च न्यायालयाचे न्या. पी. बी. बजंथरी यांची बदली पाटणा उच्च न्यायालयात करण्यात आली आहे. मागील नऊ महिन्यांपासून ते पाटणा हायकोर्टात आहेत, तर वरिष्ठ आयएएस अधिकारी आनंद किशोर बिहार सरकारमध्ये आवास व शहरी विकास विभागाचे प्रधान सचिव आहेत. मुख्यमंत्री नितीशकुमार यांच्या ते जवळच असल्याचे मानले जाते. प्रशासकीय वर्तुळात दिवसभर या प्रकाराची चर्चा सुरु होती.
विना ब्लेझर, शर्टचे बटण खुले !आयएएस व आयपीएस अधिकाऱ्यांना कोर्टात येण्यासाठी ड्रेस कोड ठरलेला आहे. आनंद किशोर यांनी त्याचे पालन केले नाही. याबाबत त्यांना चांगलेच झापले आहे. न्यायाधीश दोन मिनिटांपेक्षा अधिक काळ फटकारत आहेत. या अधिकाऱ्याने पांढरा शर्ट परिधान केलेला असून, त्याचे बटण खुले आहे. ते विना ब्लेझर सुनावणीसाठी आलेले दिसतात.
व्हायरल व्हिडीओमधील दोघांचा संवाद आनंद किशोर : न्यायालयांतील ड्रेस कोडबाबत मी अनभिज्ञ आहे. न्या. पी. बी. बजंथरी : आपण मसुरीमध्ये सिव्हील सेवा प्रशिक्षण संस्थेत गेलेले नाहीत का? आनंद किशोर : होय, तेथे प्रशिक्षण घेतलेले आहे.न्या. पी. बी. बजंथरी : न्यायालयात कोणत्या ड्रेस कोडमध्ये यायचे, हे माहीत नाही? किमान कोट घालावा, कॉलर तर खुली असू नये, हे ही माहीत नाही का? आनंद किशोर : मी हिवाळ्यात कोट वापरतो.न्या. पी. बी. बजंथरी : तुम्ही थिएटरमध्ये आला आहात, असे तुम्हाला वाटते का?