एनटीए आणि पेपर लीक प्रकरणावरून मोठा गोंधळ निर्माण झाला असतानाच राहुल गांधी यांनी सरकारवर अनेक गंभीर आरोप केले आहेत. यानंतर आता भाजपनेही राहुल गांधींवर पलटवार केला आहे. राहुल गांधी यांच्या प्रेस कॉन्फ्रेन्सला भाजपनेही प्रेस कॉन्फ्रन्सच्याच माध्यमाने प्रत्युत्तर दिले आहे. यासाठी भाजपने आपल्या सुधांशु त्रिवेदी आणि शहजाद पूनावाला या दोन तेज तर्रार प्रवक्त्यांना मैदानात उतरवले आहे. राहुल यांना प्रत्युत्तर देताना, सुधांशु त्रिवेदी यांनी केवळ प्रत्युत्तरच दिले नाही, तर बोचरे प्रश्नही विचारले. ते म्हणाले, राहुलजी राजस्थान विसरलात का? जेथे लोक सेवा आयोगाचा पेपरच फोडण्यात आला होता.
भाजपचे राष्ट्रीय प्रवक्ते सुधांशू त्रिवेदी म्हणाले, NEET परीक्षेसंदर्भात सरकार पूर्णपणे सतर्क आणि संवेदनशील आहे. सरकार लाखो लोकांसोबत अन्याय होऊ देणार नाही. याला जे कुणी जबाबदार असेल त्यांच्यावर कठोर कारवाई केली जाईल.
करून दिली राजस्थानची आठवण - सुधांशू त्रिवेदी म्हणाले, "राहुल गांधी यांना लाखो विद्यार्थ्यांच्या भवितव्याशी काहीही देणे-घेणे नाही. या विषयावर त्यांना केवळ आपले राजकारण चमकवायचे आहे. राजस्थानात पेपर फुटला होता. मात्र, त्यावर राहुल गांधी चकार शब्दही बोलले नाही." सुधांशू त्रिवेदी यांनी राजस्थानचे उदाहरण दिले. कारण तेथे राज्य सेवा आयोगाच्या भरतीमध्ये मोठा गोंधळ झाला होता आणि एकाच कुटुंबातील अनेक सदस्यांची निवड करण्यात आली होती.
काय म्हणाले होते राहुल गांधी? -तत्पूर्वी, काँग्रेसचे माजी अध्यक्ष राहुल गांधी यांनी यूजीसी-नेट आणि नीट-यूजीच्या परीक्षेत झालेल्या कथित पेपर फिटीच्या मुद्द्यावरून सरकारवर निशाणा साधला होता. ते म्हणाले होते, "सर्व शिक्षण संस्था RSS आणि भाजपाच्या लोकांनी ताब्यात घेतल्या आहेत. या शिक्षण संस्था आरएसएस आणि भाजपामुक्त होत नाहीत, तोपर्यंत हे असे प्रकार सुरूच राहणार. पंतप्रधान मोदी नीट आणि नेट परीक्षेतील घोळ थांबवू शकले नाहीत. या सर्व गैरप्रकाराला जबाबदार कोण आहे. यासाठी जबाबदार असलेल्यांना पकडले गेले पाहिजे, अशी मागणी राहुल गांधी यांनी यावेळी बोलताना केली. या सर्व प्रकाराची चौकशी व्हायलाच हवी, हे आम्ही सुरुवातीपासून सांगत आहोत. ज्यांनी पेपर लीक केला, त्यांच्यावर कठोर कारवाई करायला हवी." आगामी लोकसभा निवडणुकीत यासंदर्भात सरकारला जाब विचारणार असल्याचे राहुल गांधी यांनी सांगितले.