झारखंडचे मुख्यमंत्री हेमंत सोरेन यांच्या एका कार्यक्रमातील व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. शाळेतील विद्यार्थींनींना सोरेन हे मंचावरून सायकलचे पैसे मिळाले का म्हणून विचारत होते, तेव्हा या मुलींनी त्यांना नाही असे उत्तर दिले. तसेच सावित्रीबाई फुले किशोरी समृद्धि योजनेचा लाभ मिळाला का असेही विचारत होते, त्यालाही नाही असे उत्तर आल्याने सोरेन अधिकाऱ्यांना विचारणा करत असल्याचे या व्हिडिओमध्ये आहे.
यावरून भाजपाने टीका करण्यास सुरुवात केली आहे. झारखंड सरकारच्या पोकळ घोषणांची पोलखोल केल्याची टीका भाजपाने केली आहे. सोरेन यांना सायकलच्या प्रश्नावर नाही असे उत्तर आल्यावर त्यांनी अधिकाऱ्यांना याबाबत विचारले असता मुलींच्या खात्यात पैसे पाठविले जात आहेत, असे उत्तर दिले.
गोड्डा येथील पाथरगामा येथे आयोजित 'आपकी योजना, आपके सरकार, आपके द्वार' कार्यक्रमात सहभागी होण्यासाठी मुख्यमंत्री हेमंत सोरेन आले होते. यावेळी विद्यार्थिनींनी त्यांना थेट दोन्ही योजनांचा लाभ मिळाला नसल्याचे सांगितले.
सावित्रीबाई फुले किशोरी समृद्धि योजनेचा लाभ मिळाला का या प्रश्नावर नाही असे उत्तर येताच सोरेन यांनी ज्यांना मिळाला ठीक आहे, पुढे या योजनेतून लाभ मिळण्यासाठी नियम बनविण्यात आलेला नाही, असे स्पष्ट केले. सावित्रीबाई फुले किशोरी समृद्धी योजना ही झारखंड सरकारची महत्त्वाची योजना आहे.