आदेश रावल
नवी दिल्ली : राज्यसभेच्या उमेदवारीवरून काँग्रेसमध्ये हालचाली वाढल्या असून राज्यसभेच्या निवडणुकीत काँग्रेसला ११ जागा मिळण्याची शक्यता आहे. यात एक हरयाणा, तीन राजस्थान, दोन छत्तीसगढ आणि झारखंड, महाराष्ट्र, कर्नाटक, तामिळनाडू आणि मध्य प्रदेशच्या प्रत्येकी एका जागेचा समावेश आहे. काँग्रेसमध्ये उमेदवारांची मोठी यादी आहे. असंतुष्ट नेते गुलाब नबी आझाद आणि आनंद शर्मा हेही शर्यतीत आहेत.
अखिल भारतीय काँग्रेस कमिटीचे सरचिटणीस अजय माकन, भंवर जितेंद्र सिंह, रणदीप सिंह सुरजेवाला, मुकुल वासनिक, अविनाश पांडे, हिमाचलचे प्रभारी राजीव शुक्ला, माजी केंद्रीय मंत्री पी. चिदम्बरम, जयराम रमेश आणि हरयाणा काँग्रेसच्या माजी प्रदेशाध्यक्ष कुमारी शैलजा यांच्यासह अनेक नेते राज्यसभेच्या उमेदवारीसाठी इच्छुक आहेत.
यांची उमेदवारी निश्चित तथापि, काँग्रेस अध्यक्ष सोनिया गांधी कोणाला उमेदवारी देतील, याचा अंदाज एकाही नेत्याला नाही. काही कळलं का, अशी विचारणा नेते एकमेकांना फोनवरून करीत आहेत. काँग्रेसच्या नेत्यांना याबाबत अंदाज नसला, तरी सूत्रानुसार जयराम रमेश, पी. चिदम्बरम, भवर जितेंद्र सिंह आणि अजय माकन यांची उमेदवारी निश्चित आहे.