लखनौ - भगवा कुर्ता घालून पक्षाच्या कार्यालयात येणं काँग्रेसच्या एका कार्यकर्त्याला चांगलंच महागात पडलं. भगवा कुर्ता घालून कार्यालयात आल्याने काँग्रेसच्या स्थानिक नेत्याने या कार्यकर्त्याला बेदम मारहाण केल्याची घटना उत्तर प्रदेशमधील अमेठी या मतदारसंघात घडली आहे. या मारहाणी प्रकरणी अखिलेश शुक्ला यांनी दाखल केलेल्या तक्रारीवरून काँग्रेसचे अमेठी जिल्हाध्यक्ष प्रदीप सिंघल यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
या घटनेबाबत मिळालेल्या माहितीनुसार अखिलेश शुक्ला हे काँग्रेसचे अमेठीमधील माजी जिल्हाध्यक्ष आहेत. ते गुरुवारी काँग्रेसच्या दुर्गापूर रोडवरील पक्ष कार्यालयात गेले होते. त्यावेळी त्यांनी भगवा कुर्ता आणि पांढरी पँट परिधान केली होती. त्यांच्या या कपड्यांना तेथील कार्यकर्त्यांनी विरोध केला. तसेच त्यांच्याशी हुज्जत घालायला सुरुवात केली. तुमचा भाजपाला पाठिंबा आहे, असा आरोप करत शुक्ला यांना मारहाण करण्यात आली. तसेच त्यांनी परिधान केलेला भगवा कुर्ताही फाडून टाकण्यात आला.
दरम्यान, या संदर्भात अखिलेश शुक्ला यांनी दिलेल्या तक्रारीनंतर काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष प्रदीप सिंघल, युवक काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष शुभन सिंह आणि इतर कार्यकर्त्यांविरोधात मारहाण, शिविगाळ आणि अन्य आरोपांखाली गुन्हा नोंदवण्यात आला आहे.
मात्र काँग्रेसच्या नेत्यांनी हे आरोप निराधार असल्याचे सांगत ते फेटाळून लावले आहेत. अखिलेश शुक्ला हे पक्षाची प्रतिमा मलिन करण्यासाठी असे आरोप करत आहेत, असा दावा काँग्रेसच्या एका नेत्याने केला आहे.