नवी दिल्ली : मतमोजणी अधिक गोपनीय राहावी यासाठी मतदानाचा कल न दाखविणाऱ्या नव्या यंत्राबद्दल राजकीय पक्षांमध्ये मतभेद असल्याची माहिती निवडणूक आयोगाने कायदा मंत्रालयाला दिली.या मंत्रालयाच्या विधिमंडळ विभागाला आयोगाने पाठविलेले हे पत्र आता मंत्र्यांच्या समितीच्या दस्तावेजाचा भाग बनले आहे. भविष्यातील निवडणुकांमध्ये या नव्या यंत्राच्या वापरावर निर्णय घेण्यासाठी गेल्या महिन्यात मंत्र्यांची ही समिती स्थापन करण्यात आली होती. ही समिती एकूण मतांची बेरीज करणाऱ्या यंत्राच्या वापराच्या बाजुने असल्याचे समजते. या संदर्भात अंतिम निर्णय या समितीने केलेल्या शिफारशींच्या आधारे केंद्रीय मंत्रिमंडळ घेईल. निवडणूक आयोगाच्या माहितीनुसार एकूण मते सांगणाऱ्या यंत्राचा वापर केला जावा, असे काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस व बहुजन समाज पक्षाने स्पष्टपणे म्हटले आहे तर भाजपने पक्षांना मतदान केंद्रावर किती मते मिळाली हे निवडणूक धोरण राबविण्यास माहीत असणे आवश्यक असल्याचे म्हटले आहे. मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाने नवे यंत्र वापरण्यास तत्वत: मान्यता दिली व या यंत्राचा गैरवापर केला जाणार नाही हे बघावे तसेच वापर टप्प्याटप्प्याने करावा, असे म्हटले, अशी माहिती आयोगाने कायदा मंत्रालयाला कळविली आहे. (लोकमत न्यूज नेटवर्क)