मुंबई : प्रत्येकवेळी बायोमॅट्रिक पद्धतीने घेण्यात येणाऱ्या हातांच्या ठशांत साम्य नसल्याने रिझर्व्ह बँक आॅफ इंडिया (आरबीआय)ने नोकरीवर ठेवण्यास नकार दिला. त्यामुळे त्वचेच्या आजाराने गांजलेल्या २७ वर्षीय तरुणाने उच्च न्यायालयात याचिका दाखल केली आहे.
हायपरहायड्रोसिस (त्वचेचा आजार) असलेल्या अक्षय सपकाळ याने साहाय्यक पदासाठी आरबीआयमध्ये अर्ज केला. सर्व परीक्षा उत्तीर्ण करूनही बायोमॅट्रिक पद्धतीने दरवेळी घेण्यात येणाºया हाताच्या ठशांमध्ये साम्य नसल्याने आरबीआयने सपकाळ याला नोकरी देण्यास नकार दिला. त्यामुळे सपकाळ याने उच्च न्यायालयात धाव घेतली. या याचिकेवरील सुनावणी न्या. अकिल कुरेशी व न्या. एस. जे. काथावाला यांच्या खंडपीठापुढे होती.
अक्षयला असलेल्या त्वचेच्या आजारामुळे त्याच्या तळहातावरची व बोटांवरची त्वचा सारखी निघत असते. त्यामुळे त्याच्या हाताच्या ठशांमध्ये साम्य नसते, असा दावा अक्षयने न्यायालयात केला आहे.याचिकेनुसार, डिसेंबर २०१६ मध्ये तो प्राथमिक आॅनलाइन परीक्षा उत्तीर्ण झाला. त्यानंतर त्याला आरबीआयने मुख्य लेखी परीक्षेला बसण्यास सांगितले. आरबीआयने निवडलेल्या परीक्षा केंद्रावर पोहोचताच सर्व उमेदवारांना बायोमॅट्रिक पद्धतीने हाताचे ठसे देण्यास सांगण्यात आले. परीक्षा केंद्रात सर्व उमेदवारांचे फोटोही काढण्यात आले.
त्यानंतर परीक्षा संपल्यानंतर पुन्हा एकदा सर्व उमेदवारांना हाताचे ठसे देण्यास सांगण्यात आले. मात्र, सकाळी घेण्यात आलेल्या हाताचे ठसे आणि परीक्षा संपताना घेतलेले हाताचे ठसे यात साम्य नव्हते. त्या वेळी अक्षयने आपली समस्या तेथील अधिकाऱ्यांना सांगितली आणि कागदावर त्याचे हाताचे ठसे व हमीपत्र दिले.मे २०१७ मध्ये त्याला दुसºया टप्प्यातील परीक्षेसाठी आरबीआयने बोलाविले आणि तीही परीक्षा तो उत्तीर्ण झाला. त्या वेळेसही परीक्षा केंद्रात जाताना आणि बाहेर येताना बायोमॅट्रिक पद्धतीने हाताचे ठसे घेण्यात आले. त्या वेळीही त्यामध्ये साम्य नव्हते. आरबीआयने तेव्हाही सर्व उमेदवारांचे फोटो काढले होते,असे सपकाळ याने याचिकेत म्हटले आहे.
त्यानंतर सपकाळने अनेक वेळा आपल्या आजारासंबंधी आरबीआयला पत्राने कळविले. मात्र, जुलै २०१७ मध्ये आरबीआयने त्याला नोकरी देण्यास नकार दिला. बायोमॅट्रिक पद्धतीने घेण्यात आलेल्या हातांच्या ठशांमध्ये साम्य नसल्याने नोकरी देऊ शकत नाही, असे आरबीआयने सपकाळला कळविले.या याचिकेवर सोमवारी सुनावणी होती. आरबीआयने त्याच्या याचिकेवर आक्षेप घेतला. सपकाळच परीक्षेला उपस्थित होता, हे आरबीआय निश्चितपणे सांगू शकत नाही. मात्र, परीक्षा दिल्यानंतर सपकाळऐवजी अन्य उमेदवार परीक्षा रूममधून बाहेर यायचा, असे आरबीआयचे वकील व्यंकटेश धोंड यांनी न्यायालयाला सांगितले.‘दोन आठवड्यांत माहिती सादर करा’‘एक्स’ परीक्षा केंद्रात गेला आणि ‘वाय’ बाहेर आला, याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे आरबीआयने परीक्षा केंद्रावर काढलेले सर्व फोटो जमा करावेत आणि त्या वेळी सपकाळ परीक्षेला बसलेला की नाही, याची खात्री करावी, असे निर्देश देत उच्च न्यायालयाने आरबीआयला दोन आठवड्यांत माहिती सादर करण्याचे निर्देश दिले.