एस. पी. सिन्हा, लोकमत न्यूज नेटवर्क, पाटणा: पंतप्रधाननरेंद्र मोदी यांनी नुकतेच पाटलीपुत्र लोकसभा मतदारसंघात मणेर येथील लाडूंचे कौतुक काय केले, दुकानदारांना ऑर्डर घेता घेता नाकी नऊ आले आहेत. पंतप्रधानांनी केलेल्या कौतुकानंतर लोकांमध्ये मणेर लाडूबद्दल वेगळाच उत्साह पाहायला मिळत आहे. मागणी इतकी वाढली आहे की, आता दुकानदार लाडूंची ऑर्डर घेण्यास चक्क नम्रपणे नकार देत आहेत. विशेषत: भाजप कार्यकर्त्यांनी विजयाच्या अपेक्षेने मणेरच्या लाडूंचे आगाऊ बुकिंग सुरू केले आहे.
इतर राज्यांतून आचारी बोलावावे लागले
माजी आमदार श्रीकांत निराला यांनी मणेरमधील सर्व दुकानांमध्ये मोठ्या प्रमाणात लाडूंची ऑर्डर देऊन ठेवली आहे. “आम्ही इतके लाडू मागवले आहेत की लाडू बनवण्यासाठी इतर राज्यांतून आचारी बोलावावे लागत आहेत,” असे ते म्हणाले.
लाडू व्यवसाय करणाऱ्यांमध्ये आनंदाची लाट पसरली आहे. त्याचवेळी मणेरच्या लाडूंबाबत मोदींच्या वक्तव्यावर काँग्रेस प्रदेशाध्यक्ष अखिलेश प्रसाद सिंह म्हणाले की, मणेरचे लाडू आधीच प्रसिद्ध आहेत आणि तिथले लोक नक्कीच लाडू खातील. यावेळी फक्त मणेरचे लोकच लाडू खाणार आहेत. यावेळी पाटणा आणि दानापूरचे लोक कमी खातील, असा चिमटाही त्यांनी काढला.
ऑर्डरसाठी चढाओढ
मणेरच्या लाडूंची ऑर्डर देण्यासाठी चढाओढ सुरू असताना त्यावरून राजकारणही तापू लागले आहे. एरव्ही एकमेकांना कटू वचन ऐकवणारे राजकारणी या निमित्ताने का होईना, एकमेकांवर गोड लाडूसारखी हलकीफुलकी टीका करताना दिसत आहेत.