नवी दिल्ली - हरियाणाच्या गुरुग्राममध्ये एक संतापजनक घटना घडली आहे. व्हिलचेअरवर आलेल्या तरुणीला प्रसिद्ध रेस्टॉरंटने प्रवेश नाकारला आहे. रेस्टॉरंटमधील कर्मचाऱ्यांनी दिव्यांग तरुणीला आत जाण्यापासून रोखलं. तरुणीने दावा केला आहे की, अन्य ग्राहकांना त्रास होईल असं सांगून गुरुग्रामच्या नामांकित रेस्टॉरंट व्यवस्थापनाने आत येण्यास नकार दिला. सृष्टी पांडे (Shrishti Pandey) असं या तरुणीचं नाव असून तिने आपल्या ट्विटर अकाऊंटवरून याबाबत ट्विट करत माहिती दिली आहे. तिची पोस्ट सोशल मीडियावर जोरदार व्हायरल झाली आहे.
सृष्टी पांडे हिने मी माझे मित्र-मैत्रिणी आणि कुटुंबीयांसह शुक्रवारी बऱ्याच दिवसांनंतर बाहेर गेली होती. मात्र रेस्टॉरंटमधील फ्रंट डेस्कवरील कर्मचाऱ्यांनी सांगितलं की, व्हिलचेअर आत नेता येणार नाही. गुरुग्रामच्या डीएलएफ सायबर हबमधील 'रास्ता' या रेस्टॉरंटने असं सांगितलं. तसेच या घटनेनंतर मात्र आता रेस्टॉरंटने माफी मागितली आहे आणि या प्रकरणात तपास करणार असल्याचं सांगितलं. तरुणीने सुरुवातीला वाटलं की, हा स्टेटसचा मुद्दा आहे. मात्र जेव्हा रेस्टॉरंट कर्मचाऱ्यांनी माझ्या उपस्थितीमुळे अन्य ग्राहकांना त्रास होऊ शकतो, हे सांगितलं तेव्हा ते ऐकून मी हैराण झाले असं म्हटलं आहे.
तरुणीने पुढे सांगितलं की, बऱ्याच वादानंतर त्यांना बाहेर बसण्यासाठी सांगण्यात आलं. बाहेर बसणं हास्यास्पद होतं. थंडी होती आणि फार वेळ बाहेर बसणं शक्य नव्हतं. या घटनेमुळे मला धक्का बसला. मला खूप दु:ख होत आहे. गुरूग्राम पोलिसांनीही पुढील कारवाईसाठी संपर्क केला आहे आणि ट्विटचं उत्तर देत चौकशीची मागणी केली आहे. ही पोस्ट ट्विटरवर व्हायरल होत आहे. तसेच अनेकांनी या घटनेवर संताप व्यक्त केला आहे.
रेस्टॉरंट "रास्ता" चे संस्थापक आणि पार्टमर गौतमेश सिंह याने या तरुणीच्या पोस्टला उत्तर दिलं. "मी वैयक्तित पातळीवर याचा तपास करीत आहे. माझ्या संपूर्ण टीमकडून तुम्हाला मिळालेल्या चुकीच्या अनुभवाची माफी मागतो. क्षमस्व. जर आमच्यातील कोणताही सदस्य चूक करीत असेल तर त्याच्यावर कारवाई केली जाईल" असं म्हटलं आहे. एका हिंदी वेबसाईटने य़ाबाबतचे वृत्त दिले आहे.