ऑनलाइन लोकमत
जयपूर, दि. २२ - भारतात ' मन की बात' करणं अत्यंत कठीण असून तुम्ही मनातील अथवा काही खासगी विषयावर बोललात, तर तुमची रवानगी तुरूंगात होऊ शकते, असे खळबळजनक वक्तव्य दिग्दर्शक करण जोहरने केले आहे. त्याच्या या वक्तव्यामुळे जयपूर लिटरेचर फेस्टीव्हलची सुरुवातच वादाने झाली आहे. गुरूवारी लिटरेचर फेस्टीव्हलदरम्यान लेखिका शोभा डे यांनी करण जोहरची मुलाखत घेतली, त्यावेळी त्याने अनेक विषयांवर आपलं मत मांडलं.
गेल्या अनेक महिन्यांपासून देशात असहिष्णूतेच्या मुद्यावर बरीच चर्चा सुरू असून त्यासंबंधातील एका वक्तव्यामुळे अभिनेता आमिर खान मोठ्या वादात सापडला होता. काल झालेल्या मुलाखतीदरम्यान करणने या विषयावर स्पष्ट मत मांडण्यास नकार देत वरील वक्तव्य केले. तो म्हणाला ' भारतात अभिव्यक्ती स्वातंत्र्य (फ्रीडम ऑफ एक्स्प्रेशन) हा सर्वात मोठा विनोद असून 'लोकशाही तर त्याहून मोठी थट्टा झाली आहे.' 'तुम्हाला "मन की बात" करायची असेल, काही खासगी सांगायचे असेल तर ते या देशात शक्य नाही,' असेही तो म्हणाला.
'मला प्रत्येक वेळेस बांधल्यासारखे वाटत राहते, एखादी लिगल नोटीस कायम माझा पिच्छा पुरवत असते असं मला वाटतं. इथे तुमच्या विरोधात कधी कुठे एफआयआर दाखल होईल सांगता ते सांगता येत नाही', असे वक्तव्य त्याने एआयबी रोस्ट प्रकरणी झालेल्या वादाच्या पार्श्वभूमीवर केले. ' आपण फ्रीडम ऑफ स्पीचच्या गोष्टी करतो, पण जर तुम्ही सेलेब्रिटी असाल आणि तुम्ही तुमचे काही मत मांडले तर, एक मोठी कॉन्ट्रोव्हर्सी निर्माण होते,' असेही तो म्हणाला.
गेल्या वर्षी अभिनेता आमिर खानने देशातील असहिष्णूतेच्या मुद्यावर मत मांडल्याने मोठा गदारोळ झाला होता. 'पत्नी किरण राव हिने आपण देश सोडून जावे का?' अशी विचारणा केल्याचे सांगत आमीरने देशात असहिष्णुता वाढल्याबद्दल चिंता व्यक्त केली होती. देशातील असुरक्षित वातावरणात मुलांच्या सुरक्षेबाबत भीती वाटत असल्याची भावनाही त्याने व्यक्त केली होती. मात्र त्याच्या या वक्तव्यानंतर देशभरात तीव्र प्रतिक्रिया उमटल्या होत्या, अनेकांनी त्याला देश सोडून जाण्याचा सल्लाही दिला होता. त्याचे हे वक्तव्य त्याला भलतेच महागात पडले. त्याला 'अतुल्य भारत'चे ब्रँड अँम्बेसेडरपद गमवावे लागले तसेच रस्ता सुरक्षा अभियानातूनही त्याची हकालपट्टी करण्यात आली.