नितीन अग्रवाल , नवी दिल्ली‘बेटी बचाओ, बेटी पढाओ’ या केंद्र सरकारच्या महत्त्वाकांक्षी योजनेचा अत्यंत प्रभावीपणे प्रचार आणि प्रसार केल्याबद्दल जळगाव जिल्हा प्रशासनाची केंद्र सरकारने प्रशंसा केली असून, जळगावच्या जिल्हाधिकारी रुबल अग्रवाल यांनी हा संदेश लोकांपर्यंत पोहोचविण्यासाठी तयार केलेल्या ‘डिजिटल गुड्डी-गुड्डा’ (डिजिटल बाहुली-बाहुला बोर्ड) फलकाचा डिजिटल इंडिया अभियानात समावेश करून जळगाव जिल्हा प्रशासनाच्या आविष्काराचा गौरव केला.जिल्हाकारी रुबल अग्रवाल आणि खासदार रक्षा खडसे यांनी बुधवारी नवी दिल्लीत केंद्रीय महिला आणि बालविकासमंत्री मनेका गांधी यांची भेट घेऊन या डिजिटल बोर्डचे सादरीकरण करून त्याची वैशिष्ट्ये सांगितली.आॅडियो-व्हिडियोसोबत चित्रांचा वापर करून ‘बेटी बचाओ, बेटी पढाओ’ या योजनेची माहिती लोकांपर्यंत पोहोचविण्यात येते, असे जिल्हाधिकारी रुबल अग्रवाल यांनी सांगितले. मुख्यमंत्री कार्यालयासह शासकीय कार्यालये, जिल्हा पंचायत, प्राथमिक आरोग्य केंद्र, तसेच इतर महत्त्वाच्या सार्वजनिक ठिकाणी हा डिजिटल बोर्ड लावण्यात आल्याची माहितीही त्यांनी यावेळी दिली.या डिजिटल आविष्काराबद्दल रुबल अग्रवाल यांची प्रशंसा करून मनेका गांधी म्हणाल्या की, डिजिटल तंत्रांचा सुरेख वापर करण्याचे हे उत्तम उदाहरण आहे. ‘बेटी बचाओ, बेटी पढाओ’ ही योजना जनतेपर्यंत पोहोचविण्याचे सर्वोत्कृष्ट माध्यम आहे. या योजनेत सामील करण्यात आलेल्या इतर जिल्ह्यांतही या डिजिटल बोर्डचा वापर केला जावा. इतर अधिकारीही अशा तंत्राचा वापर करून कल्याणकारी योजना जनतेपर्यंत पोहोचविण्याचा प्रयत्न करतील, अशी आशाही त्यांनी व्यक्त केली. हा डिजिटल बोर्ड लोकप्रिय केल्याबद्दल मनेका गांधी यांनी रावेर आणि जळगावच्या खासदारांचीही प्रशंसा केली.जिल्हाधिकारी रुबल अग्रवाल यांनी सर्वांत आधी या डिजिटल बोर्डची सुरुवात केली. रावेरच्या खासदार रक्षा खडसे आणि जळगावचे खासदार ए. टी. नाना पाटील यांच्या सहकार्याने हे बोर्ड सार्वजिनक ठिकाणी लावण्यास सुरुवात केली होती. या बोर्डवर ‘बेटी बचाओ, बेटी पढाओ’ या योजनेची माहिती स्थानिक भाषेतून देण्यात आली आहे. आॅडियो-व्हिडिओ माध्यमासोबत यात चित्रांचाही वापर केला आहे. प्रत्येक महिन्याला जन्माला येणाऱ्या बाळांची माहितीही दिली जाते.
डिजिटल गुड्डी-गुड्डा बोर्ड राष्ट्रीय पातळीवर
By admin | Published: July 02, 2015 3:24 AM