ऑनलाइन लोकमत
नवी दिल्ली, दि. १ - गरीबी आणि श्रीमंतांमधली दरी कमी करण्यासाठी सर्वोत्तम माध्यम हे डिजिटल इंडिया असेल असं सांगत येत्या काळात १८ लाख रोजगार डिजियल क्षेत्रात निर्माण होणार असल्याचे पंतप्रधान नरेंद्र मोदींनी सांगितले. राजधानीमध्ये डिजिटल इंडिया वीकचे उद्घाटन मोदींनी केले आणि आयटी क्षेत्राचे महत्त्व अधोरेखीत करतानाच भारत संपू्र्ण शक्तीने या क्षेत्रात आघाडी मिळवेल असे ठामपणे सांगितले.
मोदींच्या भाषणातील महत्त्वाचे मुद्दे:
- भ्रष्टाचाराची लढाई टेक्नॉलॉजीच्या माध्यमातून लढता येईल आणि सगळी गळती थांबवता येईल.
- हिंदुस्थानमधलं उत्पादन असेल तर सायबर सिक्युरिटी डोळे झाकून घ्यावी असं सगळ्या जगाला वाटवं अशी कामगिरी भारतातले तरूण करू शकतात आणि त्यासाठी डिजिटल इंडिया आहे.
- जगामध्ये रक्तविहीन युद्ध होऊ घातलेलं आहे. अशावेळी सुखानं जगण्यासाठी भारत जगाला सुरक्षा देऊ शकतं की नाही. रक्तविहिन युद्ध सायबर वॉरच्या माध्यमातून असून सायबर सिक्युरिटी महत्त्वाची आहे.
गुगलचा शोध भारतात का लागू नये, इनोव्हेशन भारतात का होऊ नये त्यासाठी केवळ मेक इन इंडियाच नाही तर डिझाईन इन इंडियाची पण गरज आहे.
- पेट्रोल आयात करण ही मजबुरी आहे परंतु आयातीमध्ये दुसरा वाटा इलेक्ट्रॉनिक्स गुड्सचा आहे. भारतामध्ये इलेक्ट्रॉनिक्स गुड्स बनायला हवीत आणि आयातीची काही गरज राहू नये हेच डिजिटल इंडियाचं मुख्य ध्येय आहे.
- सगळी सर्टिफिकेट्स, महत्त्वाची कागदपत्रे डिजिटल लॉकरमध्ये ठेवण्यात येतील आणि केवळ एका डिजिटल नंबरमध्ये तुमचं काम होऊन जाईल याचप्रकारे बँकापण लवकरच पेपरलेस व प्रिमायसेसलेस होणार आहे.
- मिनिमम गव्हर्नमेंट मॅक्झिमम गव्हर्नन्ससाठी डिजिटल क्रांती अत्यावश्यक असून त्यापुढे मोबाईल गव्हर्नन्स हे पुढचं पाऊल असेल आणि ते फार दूर नाहीये.
- गरीबातल्या गरीबालापण डिजिटल क्रांतीचा लाभ मिळायला हवा अन्यथा डिजिटल डिव्हाइड होईल जी सगळ्या प्रकारच्या दुफळीपेक्षा जास्त भयंकर असेल.
- सध्या भारतात २५ ते ३० कोटी लोक इंटरनेट वापरतात पण अजून त्यापेक्षा जास्त लोकांना अद्याप इंटरनेट वापरणं परवडत नाही ही वस्तुस्थिती आहे आणि ती बदलायला पाहिजे.
- आधी मानव समूह नदी किनारी, समुद्र किनारी वास्तव्य करायचे नंतर महामार्गांजवळ शहरं उभी राहिली आजच्या घडीला मात्र, जिथे ऑप्टिकल फायबर जिथे असेल तिथं शहरं वसतिल.
- लहान मुलगा पण आता स्मार्टफोनशी खेळतो त्याला त्याचं महत्त्व कळतं. आपल्यालाही डिजिटल क्रांतीचं महत्त्व कळायला हवं नाहीतर जग पुढे जाईल नी आपण तिथेच राहू.
- डिजिटल इंडियाच्या माध्यमातून किमान ४.५ लाख कोटी रुपयांची गुंतवणूक होणार असून १८ लाखांपेक्षा जास्त रोजगार निर्माण होईल.
- रवीशंकर प्रसाद व त्यांच्या टीमने डिजिटल इंडियाचं व्यवस्थापन अत्यंत कौशल्याने व मेहनतीने केले आहे, त्यांचं अभिनंदन.
भारताचा जीडीपी ८ ते १० टक्क्यांनी वाढणार - जेटली
भारताचा आर्थिक विकास दर केवळ ६ त ८ टक्क्यांनी नाही तर ८ ते १० टक्क्यांनी वाढेल असा विश्वास केंद्रीय अर्थमंत्री अरूण जेटलींनी व्यक्त केला आहे. जनधन योजनेत १६ कोटी लोकांनी बँक खाती उघडली असून डिजिटल इंडियाचा लाभ समाजातल्या तळागाळातल्या लोकांना मिळण्यास सुरुवात झाली आहे असे जेटली म्हणाले. डिजिटल इंडियामुळे गरीबांपासून श्रीमंतापर्यंत सगळ्यांना लाभ होईल परंतु मुख्यत: गरीबांना जास्त फायदा होईल अशी आशा जेटलींनी व्यक्त केली.