नवी दिल्ली : कोविड-१९ महामारीनंतर डिजिटल पेमेंट प्लॅटफॉर्मवरील अवलंबित्व मोठ्या प्रमाणात वाढल्यामुळे वित्तीय घोटाळ्यांचे प्रमाण प्रचंड वाढले आहे. त्यामुळे नागरिकांनी आॅनलाईन असताना सावध राहावे, असे प्रतिपादन राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोव्हाल यांनी केले आहे.
भारताचे सायबरस्पेस सुरक्षित, विश्वसनीय आणि प्रतिरोधक असावे यासाठी केंद्र सरकार राष्ट्रीय सायबर सुरक्षा रणनीती -२0२0 आणणार आहे, असेही डोव्हाल यांनी सांगितले.केरळ पोलीस आणि अन्य एका संस्थेने आयोजित केलेल्या सायबर सुरक्षाविषयक कार्यक्रमात बोलताना डोव्हाल यांनी सांगितले की, कोविड-१९ महामारीमुळे रोख रक्कम हाताळण्याचे प्रमाण कमी होऊन डिजिटल पेमेंट प्लॅटफॉर्मवरील अवलंबित्व वाढले आहे. त्यातून मोठ्या प्रमाणात आॅनलाईन डाटा शेअरिंग होत आहे. समाज माध्यमांवरील उपस्थितीही वाढली आहे.
यात समाजकंटकांनाही संधी सापडली आहे. सायबर स्वच्छतेची जाणीव नसल्यामुळे सायबर गुन्ह्यांचे प्रमाण ५00 टक्के वाढले आहे.