ऑनलाइन लोकमत
नवी दिल्ली, दि. 18 - काँग्रेस नेते दिग्विजय सिंह आणि वाद हे जणू समीकरणच झालं आहे. जम्मू-काश्मीरचा उल्लेख भारतव्याप्त काश्मीर असा केल्याने काँग्रेसचे नेते दिग्विजय सिंह पुन्हा एकदा अडचणीत आले आहेत. मात्र भारतव्याप्त काश्मीर बोलून गेल्यानंतर लागलीच चूक लक्षात आल्यावर दिग्विजय सिंह यांनी सारवासारव केली आहे.
काश्मीर भारताचाच भाग असून, पाकव्याप्त काश्मीर आपल्याला म्हणावयाचे होते, अशी सारवासारवही दिग्विजय सिंह यांनी केली आहे. सिंह यांनी यापूर्वी अल कायदाचा म्होरक्या दहशतवादी ओसामा बिन लादेनचा उल्लेख ओसामाजी असा केल्यानं वाद ओढवून घेतला होता. त्यावेळी हाफिज सईद याचा उल्लेख सिंह यांनी सईदसाहेब असा केला होता.
एका संवेदनशील विषयावर सिंह यांनी टिप्पणी करताना असा उल्लेख केल्याने त्यांच्या सोशल मीडियावरून तीव्र प्रतिक्रिया उमटल्या होत्या. पुढे सारवासारव करण्यासाठी त्यांनी पाकव्याप्त काश्मीर आणि भारतव्याप्त काश्मीर असे काहीही असले तरी जनतेमध्ये चर्चेद्वारेच विश्वास निर्माण करू शकतो, असे मतही सिंह यांनी व्यक्त केले आहे.