नवी दिल्ली - भारतीय हवाई दलाने पाकिस्तानात घुसून बालकोट भागात अनेक दहशतवादी अड्डे उधवस्त केले. पुलवामा हल्ल्याच्या बदला घेण्यासाठी भारताने दहशतवाद्यांना टार्गेट करत पाकिस्तानातील त्यांच्या तळांवर एअर स्ट्राईक केला. या एअर स्ट्राईकबाबत काँग्रेसचे जेष्ठ नेते दिग्विजय सिंह यांनी संशय व्यक्त केला. जर एअर स्ट्राईक झाला असेल त्यात किती दहशतवादी मारले गेले याची माहिती सरकारने द्यावी अशी मागणी सिंह यांनी केली.
मात्र आत्ता पुन्हा एकदा ऱॉयटर या संस्थेचा हवाला देत दिग्विजय सिंह यांनी ट्विट करत एअर स्ट्राईकवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे. हवाई दलाच्या एअऱ स्ट्राईकमध्ये दहशतवाद्यांचे किती नुकसान झाले त्याचे पुरावे द्यावेत, आंतरराष्ट्रीय पातळीवर एअऱ स्ट्राईकवर शंका उपस्थित होत आहे त्याचे निरसन केंद्र सरकारने करावे अशी मागणी दिग्विजय सिंह केली.
रॉयटर या संस्थेने एअर स्ट्राईकनंतरच्या 6 दिवसांनंतर 4 मार्च रोजी बालकोट भागात घेतलेले सँटेलाईट इमेज जारी केले. या फोटोमध्ये ज्या ठिकाणी हवाई दलाने बॉम्ब टाकले त्याठिकाणी असलेल्या इमारती जैसे थे असल्याचा दावा केला. जैश-ए-मोहम्मदकडून दहशतवाद्यांना प्रशिक्षण देण्यासाठी ज्या मदरसा इमारतीचा वापर केला जातो ती इमारत बॉम्ब हल्ल्यानंतर साबूत असल्याचं दाखविण्यात आले आहे.
पाकिस्तानच्या उत्तर पूर्व भागात असणाऱ्या बालकोट परिसरात जैश-ए मोहम्मद या दहशतवादी संघटनेकडून मदरशा चालवला जातो. याच ठिकाणी दहशतवाद्यांना ट्रेंनिग दिले जाते. दहशतवाद्यांच्या या कॅम्पला पाकिस्तानकडूनही मदत होत असल्याचा आरोप भारताकडून केला जातो. जैश-ए-मोहम्मद संघटनेचे सर्वांत मोठे प्रशिक्षण केंद्र बालकोट भागात असून मौलाना मसूद अजहरचा मेहुणा मौलाना युसूफ अजहर हे प्रशिक्षण केंद्र चालवत होता. हेच केंद्र पहाटेच्या अंधारात भारतीय हवाई दलाने एअऱ स्ट्राईक करत उधवस्त केल्याची माहिती परराष्ट्र सचिव विजय़ गोखले यांनी माध्यमांना दिली होती.