नवी दिल्ली, दि. 8 - काँग्रेस नेते दिग्विजय सिंह यांनी अत्यंत खालच्या पातळीवर जात पंतप्रधान नरेंद्र मोदींवर टीका केली आहे. दिग्विजय सिंह यांनी ट्विटरवर पंतप्रधान नरेंद्र मोदींचा उल्लेख करत असंस्कारी आणि अश्लिल भाषेत टिप्पणी केली आहे. दिग्विजय सिंह यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या समर्थकांचा भक्त असा उल्लेख केला आहे, जो सोशल मीडियाच्या माध्यमातून नेहमी होत असतो. धक्कादायक म्हणजे दिग्विजय सिंह यांनी जो फोटो शेअर केला आहे त्यामध्ये शिवी लिहिण्यात आली आहे.
दिग्विजय सिंह यांनी जो फोटो शेअर केला आहे तो एक मेमे आहे. या फोटोसोबत लिहिण्यात आलं आहे की, 'माझ्या दोन मोठ्या उपलब्धी आहेत - पहिली म्हणजे भक्तांना चु** बनवलं आणि चु**ना भक्त बनवलं'. यासोबतच दिग्विजय सिंह यांनी ट्विटमध्ये लिहिलं आहे की, 'हा मेमे माझा नाही आहे, पण शेअर करण्यापासून स्वत:ला रोखू शकलो नाही. लोकांना मुर्ख बनवण्यात मोदी सर्वोत्तम आहेत'. दिग्विजय सिंह राज्यसभा खासदार असण्यासोबतच काँग्रेसचे सरचिटणीस आहेत.
दिग्विजय सिंह यांचं हे ट्विट पाहिल्यानंतर अनेकांनी संताप व्यक्त करण्यास सुरुवात केली. लोकांचा रोष पाहून दिग्विजय सिंह यांनी हे ट्विट डिलीट केलं आहे.
दिग्विजय सिंह यांनी पक्षाला अडचणीत आणण्याची ही काही पहिलीच वेळ नाही. याआधीही अनेकदा वादग्रस्त वक्तव्य केल्याने ते अडचणीत आले आहेत. गतवर्षी पत्रकारांशी बोलताना त्यांनी पाकिस्तानव्याप्त काश्मीरचा उल्लेख भारतव्याप्त काश्मीर असा केला होता. 8 जुलै रोजी दहशतवादी बुरहान वानीला सुरक्षा जवानांनी ठार केल्याने आधीच काश्मीर खो-यात वातावरण तापलं असताना दिग्विजय सिंह यांनी हे वक्तव्य केलं होतं.
2013 मध्ये आपल्याच पक्षाच्या महिला खासदारा मीनाक्षी नटराजन यांचे वर्णन '१०० टंच माल' असे वर्ण केल्याने दिग्विजय सिंह यांच्यावर टीका झाली होती. काँग्रेसच्या खासदार मीनाक्षी नटराजन यांच्या मंदसौर मतदारसंघात झालेल्या जाहीर सभेत दिग्विजय सिंह बोलत होते. आपल्याला खरं सोनं असं म्हणायचं होतं अशी सारवासावर त्यांनी केली होती. तसंच चुकीचं वार्तांकन करणा-या टीव्ही चॅनेल्सविरोधात कारवाईची धमकी दिली होती.