नवी दिल्ली-
काँग्रेस अध्यक्षपदाच्या निवडणुकीची निवडणूक आता रंगतदार होण्याची चिन्हं आहेत. राजस्थानचे मुख्यमंत्री अशोक गहलोत यांचं नाव जवळपास निश्चित समजलं जात असतानाच आता ज्येष्ठ नेते दिग्विजय सिंह यांनीही शड्डू ठोकला आहे. काँग्रेस अध्यक्षपदाच्या निवडणुकीत दिग्विजय सिंह देखील उतरणार आहेत. लवकरच ते आपला अर्ज दाखल करणार असल्याची माहिती समोर आली आहे. दिग्विजय सिंह सध्या राहुल गांधी यांच्यासोबत 'भारत जोडो' यात्रेत सहभागी आहेत. आता ते आज रात्रीपर्यंत दिल्लीत दाखल होणार असून अध्यक्षपदाच्या निवडणुकीसाठी अर्ज दाखल करणार असल्याची माहिती समोर आली आहे.
गहलोत यांच्या निवडीबद्दल प्रश्नचिन्ह, काँग्रेस अध्यक्षपदासाठी अन्य नावांचा विचार सुरू
आतापर्यंत काँग्रेसच्या अध्यक्षपदाच्या शर्यतीत शशी थरूर आणि अशोक गहलोत यांचं नाव आघाडीवर होतं. पण राजस्थान काँग्रेसमधील अंतर्गत वादामुळे अशोक गहलोत यांच्या निवडणूक लढवण्याच्या निर्णयाबाबत अजूनही साशंकता वर्तवली जात आहे. दुसरीकडे शशी थरूर यांची उमेदवारी पक्की समजली जात आहे. ३० सप्टेंबर रोजी ते अध्यक्षपदासाठीचा आपला अर्ज दाखल करणार आहेत. निवडणुकीस इच्छुक उमेदवारांना ३० सप्टेंबरलाच अर्ज दाखल करता येणार आहे. कारण निवडणूक अधिकारी मधुसूदन मिस्त्री उद्या दिल्लीत नसतील अशी माहिती समोर आली आहे.
आणखी काही नावांवर खलबतंथरूर, गहलोत यांच्यासोबतच अध्यक्षपदासाठीच्या शर्यतीत मुकूल वासनिक, मल्लिकार्जून खर्गे, केसी वेणुगोपाल यांचीही नावं समोर आली आहेत. या लिस्टमध्ये दिग्विजय सिंह यांचंही नाव होतं. आता ते निश्चित झालं आहे.
दिग्विजय सिंह यांचं पारडं कितपत जड?दिग्विज सिंह यांच्याकडे संघटनात्मक आणि प्रसासकीय अनुभव आहे. ते दोनवेळा मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री राहिलेले आहेत. त्यांची गणती गांधी कुटुंबीयांच्या विश्वासू नेत्यांमध्ये केली जाते. काँग्रेसनं सध्या संघ आणि त्यांच्या हिंदुत्वच्या विरोधात आवाज उठवला आहे. याच विरोधात बऱ्याच काळापासून दिग्विजय सिंह देखील आवाज उठवत आले आहेत.
ठरलं! शशी थरुर काँग्रेस अध्यक्षपदाची निवडणूक लढवणार, 30 सप्टेंबरला अर्ज दाखल करणार
दिग्विजय सिंह यांच्याविरोधात जाणाऱ्या बाजू पाहिल्या तर २०१९ साली ते स्वत: भोपाळमधून निवडणुकीत पराभूत झाले आहेत. तसंच आक्षेपार्ह विधानांमुळेही ते टीकेच्या केंद्रस्थानी राहिले आहेत. त्यांच्या काही विधानांमुळे काँग्रेस पक्षाला अडचणींचा सामना करावा लागला आहे. सध्याचे वारे पाहात दिग्विजय सिंह यांना जनतेतील पाठिंबा देखील कमी कमी होऊ लागला आहे. तसंच घराणेशाहीच्या टीकेलाही त्यांना सामोरं जावं लागलं आहे. मुलगा आणि भावाला राजकारणात स्थिरस्थावर करण्यासाठी ते प्रयत्न करत असल्याचा आरोप त्यांच्यावर केला जातो.