दिग्विजय सिंह यांना साधू-संतांचा पाठिंबा, भोपाळमध्ये विजयासाठी केला यज्ञ
By ऑनलाइन लोकमत | Published: May 8, 2019 05:51 AM2019-05-08T05:51:36+5:302019-05-08T05:52:14+5:30
काँग्रेसचे ज्येष्ठ नेते दिग्विजय सिंह यांच्याविरुद्ध भाजपने भोपाळ मतदारसंघात साध्वी प्रज्ञा सिंह यांना उतरवल्याने आता अनेक साधू-संत-महन्त आता दिग्विजय सिंह यांच्या प्रचारासाठी उतरले आहेत. कम्प्युटर बाबांना हाताशी धरून काँग्रेसने ही रणनीती आखली आहे.
भोपाळ : काँग्रेसचे ज्येष्ठ नेते दिग्विजय सिंह यांच्याविरुद्ध भाजपने भोपाळ मतदारसंघात साध्वी प्रज्ञा सिंह यांना उतरवल्याने आता अनेक साधू-संत-महन्त आता दिग्विजय सिंह यांच्या प्रचारासाठी उतरले आहेत. कम्प्युटर बाबांना हाताशी धरून काँग्रेसने ही रणनीती आखली आहे.
बेगुसरायमध्ये कम्युनिस्ट पक्षाचे उमेदवार कन्हय्याकुमार यांच्यासाठी प्रचार करणाऱ्या अभिनेत्री स्वरा भास्कर यांनीही दिग्विजय सिंह यांचा प्रचार सुरू केला आहे. स्वत: कन्हय्या कुमार हेही दिग्विजय यांच्या प्रचारासाठी दोन सभा घेणार आहेत.
कम्प्युटर बाबांनी देशभरातील हजारो साधूंना भोपाळमध्ये आणले असून, ते सध्या दिग्विजय सिंह यांचा प्रचार करताना दिसत आहेत. कम्प्युटर बाबा म्हणाले की, गेली पाच वर्षे केंद्रात भाजपचे सरकार आहे. पण त्यांनी या काळात अयोध्येत राम मंदिर उभारले नाही. त्यामुळे राम मंदिर नाही, तर मोदी पण नाही' अशी आमची घोषणा आहे. स्वत: दिग्विजय सिंह यांनी कम्प्युटर बाबांसोबत यज्ञामध्ये भागही घेतला. या यज्ञासाठी हजारो साधू भोपाळमध्ये आले होते.
दिग्विजय सिंह यांच्या समर्थनार्थ हे सात ते आठ हजार साधू भोपाळमध्ये मिरवणूक काढणार असून, त्यासाठी कम्प्युटर बाबांनीच पुढाकार घेतला आहे. भाजपच्या प्रज्ञा सिंह यांना उमेदवारी देऊ न भाजपने हिंदूंची मते मिळवण्याचा प्रयत्न चालवला असताना काँग्रेसच्या दिग्विजय सिंह यांच्यामागेही साधू-संत उभे राहिले आहेत. (वृत्तसंस्था)
...तर समाधी घेऊ
पंचायती श्रीनिरंजनी आखाड्याचे महामंडलेश्वर वैराग्यनंद गिरी महाराज यांनी दिग्विजय सिंह यांना पाठिंबा जाहीर केला. ते म्हणाले की, अनेक जण धर्माच्या नावावर फूट पाडत आहेत. सनातन धर्मात फूट पाडली जात आहे. त्यामुळेच आम्ही सारे जण दिग्विजय सिंह यांच्यामागे ठामपणे उभे आहोत. निवडणुकीत दिग्विजय सिंह विजयी न झाल्यास आपण समाधी घेऊ, असेही ते म्हणाले.