मध्य प्रदेश लोकसभा निवडणुकीचा तिसरा टप्पा 2024 अतिशय रंजक असणार आहे. यावेळी भाजपा आणि काँग्रेसचे अनेक दिग्गज निवडणुकीच्या मैदानात आमनेसामने येणार आहेत. काँग्रेसचे ज्येष्ठ नेते दिग्विजय सिंह हेही यावेळी नशीब आजमावणार आहेत. याच दरम्यान, नेते मंडळी जनतेला आकर्षित करण्यासाठी इमोशनल कार्ड वापरत आहेत. दिग्विजय सिंह यांनीही असंच काहीसं केलं आहे. त्यांनी मोठं विधान केलं आहे.
ही निवडणूक आपली शेवटची निवडणूक असल्याचा दावा त्यांनी केला आहे. राजगडच्या जनतेला संबोधित करताना दिग्विजय सिंह म्हणाले, "कृपया समजून घ्या की, माझं आयुष्य राजगड लोकसभा मतदारसंघाशी जोडलेलं आहे. मी इथे पैसे कमवण्यासाठी नाही तर जनसेवेसाठी आलो आहे. मी नेहमीच येथील कार्यकर्त्यांसोबत काम केलं आहे आणि यापुढेही करत राहीन."
"जेव्हा मला राजगडमधून लोकसभा निवडणूक लढवण्यास सांगण्यात आले, तेव्हा मला पद आणि प्रतिष्ठेची गरज नाही कारण मी आधीच राज्यसभा सदस्य आहे, पण मला वाटलं की भाजपाच्या राज्यात ज्या प्रकारे राजगडचा विकास थांबला आहे. आरोग्य, शिक्षण, वीज, सिंचन अशा सर्वच बाबतीत जनतेचा छळ झाला आहे, त्यामुळे मला लोकांमध्ये जाऊन त्यांच्यासाठी लढलं पाहिजे."
दिग्विजय सिंह यांनी स्पष्टपणे सांगितलं की, "मी तुम्हाला सांगण्यासाठी आलो आहे की, ही माझी शेवटची निवडणूक आहे आणि मी येथे जनतेची लढाई लढण्यासाठी आलो आहे. माझी जनतेला एकच विनंती आहे की, तुम्ही दहा वर्षे खासदार म्हणून एका व्यक्तीला नेमलंत, आता मलाही पाच वर्षे आजमावून पाहा. तुम्हाला निराश करणार नाही."
काँग्रेसचे ज्येष्ठ नेते दिग्विजय सिंह हे त्यांच्या वयाचे कारण देत पुढील निवडणुका न लढवण्याचा विचार करत आहेत. आता ते 77 वर्षांचे आहेत, त्यामुळे ही त्यांची शेवटची निवडणूक असेल, असं त्यांनीच याआधी सांगितलं होतं. अशा स्थितीत जनता त्यांना आणि काँग्रेसला साथ देईल, अशी अपेक्षा त्यांनी आता व्यक्त केली आहे.