भोपाळ - काँग्रेस नेते दिग्विजय सिंह यांनी जम्मू-काश्मीरमधील पुलवामा येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्याला ‘दुर्घटना’ म्हटल्यानंतर त्यांच्यावर टीकेची झोड उठली आहे. 'दिग्विजय सिंह यांच्या बोटाला आणि तोंडाला गुप्तरोग झाला असून भारताविरोधात विधान केल्याशिवाय त्यांना जेवण जात नाही' असे वादग्रस्त विधान एका भाजपा नेत्याने केले आहे. दिग्विजय सिंह यांच्यावर टीका करताना मध्य प्रदेशमधील भाजपा नेते गोपाल भार्गव यांनी असे विधान केले आहे.
दिग्विजय सिंह यांनी काही दिवसांपूर्वी एका ट्वीटमध्ये पुलवामा दहशतवादी हल्ल्याला ‘दुर्घटना’ म्हटले होते. या ट्वीटचा दाखला देत 'दिग्विजय सिंह यांच्या बोटाला आणि तोंडाला गुप्तरोग झाला असून जोवर ते मोबाईलवर बोटं चालवत नाही आणि तोंडातून भारताविरोधात विधान करत नाही, तोवर त्यांना जेवणच जात नाही' असे गोपाल भार्गव यांनी म्हटले आहे.
माजी केंद्रीय मंत्री आणि काँग्रेसचे वरिष्ठ नेते कपिल सिब्बल यांनी सरकारकडे एअर स्टाईकचे पुरावे मागितले होते. यानंतर एअर स्ट्राईकबाबत काँग्रेसचे नेते दिग्विजय सिंह यांनी देखील संशय व्यक्त केला होता. 'पुलवामातील दुर्घटनेनंतर आपल्या हवाई दलाने केलेल्या एअर स्ट्राईकबद्दल परदेशी प्रसारमाध्यमांकडून शंका उपस्थित केल्या जात आहेत. त्यामुळे भारत सरकारच्या विश्वासार्हतेवर प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहे,' असे दिग्विजय यांनी ट्वीटमध्ये म्हटले होते.
'पुलवामा हल्ल्याला अपघात म्हणता, मग राजीव गांधींची हत्याही अपघातच होती का?'पुलवामातील दहशतवादी हल्ल्याला अपघात म्हणणाऱ्या काँग्रेस नेते दिग्विजय सिंह यांना केंद्रीय मंत्री व्ही. के. सिंह यांनी प्रत्युत्तर दिले आहे. 'राजीव गांधींची हत्या दहशतवाद्यांची केलेली कारवाई होती की तीदेखील अपघात होती? असा प्रश्न मला दिग्विजय सिंह यांना विचारावासा वाटतो,' असे सिंह म्हणाले. राजीव गांधींबद्दल पूर्णपणे आदर बाळगून मी हा प्रश्न विचारत आहे, असे त्यांनी स्पष्ट केले. पुलवामा हल्ल्याला अपघात म्हटल्याने आणि एअर स्ट्राइकबद्दल प्रश्नचिन्ह उपस्थित केल्याने भाजपाने दिग्विजय सिंह यांच्यावर टीकेची झोड उठवली.
14 फेब्रुवारीला जम्मू-काश्मीरमधील पुलवामात सीआरपीएफच्या ताफ्यावर दहशतवादी हल्ला झाला. सीआरपीएफचे अडीच हजार जवान बसेसमधून श्रीनगर जात असताना दहशतवाद्यांनी आत्मघाती हल्ला घडवून आणला. ताफ्यातील एका बसला स्फोटकांनी भरलेल्या एका कारने धडक दिली. यामध्ये 40 जवान शहीद झाले. जैश-ए-मोहम्मदने या हल्ल्याची जबाबदारी स्वीकारली होती. यानंतर देशभरात संतापाची लाट होती. या हल्ल्याचा बदला म्हणून 26 फेब्रुवारीला हवाई दलाने मध्यरात्री नियंत्रण रेषा ओलांडून पाकव्याप्त काश्मीरमधील जैशचे तळ उद्ध्वस्त केले.