लोकसभा निवडणुकीच्या 2024 च्या पार्श्वभूमीवर मध्य प्रदेशातही राजकीय वातावरण तापलं आहे. मध्य प्रदेशचे माजी मुख्यमंत्री आणि काँग्रेसचे ज्येष्ठ नेते दिग्विजय सिंह हेही राजगडमधून निवडणूक लढवणार असल्याची चर्चा आहे. याच दरम्यान, दिग्विजय सिंह यांनी मीडियाच्या प्रश्नांना उत्तरं दिली आहेत. मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री आणि भाजपा नेते मोहन यादव यांच्या आरोपांवर दिग्विजय सिंह म्हणाले की, मी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि शिवराज सिंह चौहान यांच्याविरोधातही निवडणूक लढवण्यास तयार आहे.
दिग्विजय सिंह यांना पत्रकारांनी प्रश्न विचारला की, मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री आरोप करत होते की, त्यांना भोपाळमधून निवडणूक लढवायची होती, पण काँग्रेसकडे उमेदवार नव्हता, त्यामुळे दिग्विजय सिंह यांना 30 वर्षांनंतर राजगडला त्यांच्या घरी परत यावं लागलं. त्यावर दिग्विजय सिंह यांनी भाजपावर जोरदार पलटवार केला आहे.
दिग्विजय सिंह यांनी माध्यमांच्या प्रश्नांना उत्तर देताना सांगितलं की, "मी पंतप्रधान नरेंद्र मोदींविरोधात, शिवराज सिंह चौहान यांच्याविरोधात निवडणूक लढवण्यास तयार आहे, पण पक्षाने मला येथून निवडणूक लढवण्यास सांगितले आहे. त्यामुळे मी येथून निवडणूक लढवणार आहे." दिग्विजय सिंह राजगडमधून निवडणूक लढवणार असल्याच्या चर्चा असताना मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री डॉ. मोहन यादव यांनी काँग्रेसवर हल्लाबोल केला होता.
मुख्यमंत्री सवाल करत म्हणाले की, "काँग्रेसला निवडणूक लढवण्यासाठी उमेदवारही मिळत नाहीत आणि त्यामुळेच दिग्विजय सिंह 30 वर्षांनंतर निवडणूक लढवण्यासाठी घरी परतत आहेत. तुम्ही भोपाळमधून का लढत नाही? पंतप्रधान मोदी आणि भाजपाच्या बाजूने वारे वाहत आहे आणि त्यामुळे काँग्रेसमधील कोणताही नेता निवडणूक लढवण्यास तयार दिसत नाही. ते मैदान सोडून जात आहेत."