नवी दिल्ली - एमआयएमचे राष्ट्रीय प्रवक्ते आणि आमदार वारिस पठाण यांच्या '15 कोटी मुस्लीम 100 कोटी हिंदुंवर भारी' या वक्तव्याचा सर्व स्तरातून निषेध करण्यात येत आहे. गीतकार जावेद अख्तर यांनी वारिस पठाण यांना सुनावल्यानंतर काँग्रेस नेते दिग्विजय सिंह आणि राष्ट्रीय जनता दलाचे नेते तेजस्वी यादव यांनी वारिस पठाण यांच्यावर कारवाई करण्याची मागणी केली आहे.
दिग्विजय सिंह यांनी ट्विट करून ही मागणी केली आहे. एमआयएम पक्षाचे राष्ट्रीय प्रवक्ते आणि महाराष्ट्रातील नेते वारिस पठाण यांच्या वक्तव्याचा मी निषेध करतो. अशाच प्रकारचे वक्तव्य असुद्दीन ओवेसी यांचे बंधू अकबरुद्दीन ओवेसी यांनी देखील केले होते. वारिस पठाण यांच्याविरुद्ध कडक कारवाई व्हावी. काँग्रेस नेहमीच कट्टरतावादी विचारांच्या विरोधात आहे. भाजप आणि एमआयएम हे पक्ष एकमेकांना पूरक असल्याची टीका दिग्विजय सिंह यांनी केली आहे.
या व्यतिरिक्त तेजस्वी यादव यांनी देखील वारिस पठाण यांच्यावर कडाडून टीका केली आहे. संविधानप्रिय आणि न्यायप्रिय लोकांनी अशा प्रकराचे वक्तव्य करणाऱ्यांचा बहिष्कार करायला हवा. पठाण यांचे वक्तव्य निंदणीय आहे. त्यांना तत्काळ अटक करण्यात यावी. एमआयएम भाजपची बी टीम असल्याचा आरोपही त्यांनी केला. तसेच जे कोणी चिथावणी देणारे वक्तव्य करेल त्याच्यावर कारवाई करण्यात यावी, अशी मागणी तेजस्वी यांनी केली आहे.