ऑनलाइन लोकमत
बंगळुरू, दि. 12 - संदीप दीक्षित यांनी लष्कर प्रमुख बिपिन रावत यांच्याबाबत केलेले वक्तव्य चुकीचे असल्याचे मत राहुल गांधी यांनी व्यक्त केले आहे. बंगळुरू येथे झालेल्या कार्यक्रमात राहुल गांधी यांनी एकीकडे मोदी सरकारवर चौफेर हल्ला चढवला. त्याचवेळी आपल्याच पक्षाच्या माजी खासदाराने लष्करप्रमुखांबाबत केलेल्या वादग्रस्त वक्तव्याबाबतही त्यांनी आपले मौन सोडले.
दीक्षित यांच्या वक्तव्याचा निषेध करताना राहुल गांधी म्हणाले, "लष्करप्रमुखांबाबत संदीप दीक्षित यांनी केलेले वक्तव्य पूर्णपणे चुकीचे आहे. लष्करप्रमुखांबाबत राजकारण्यांनी अशाप्रकारचे वक्तव्य करण्याची गरज नाही." दीक्षित यांनी काल लष्करप्रमुखांबाबत वक्तव्य केल्यानंतर त्यांच्यावर चौफेर टीका होऊ लागली होती. त्यामुळे पक्षाने या वक्तव्यापासून अंग काढून घेतले होते.
काल लष्करप्रमुख बिपिन रावत यांच्यावर टीका करताना संदीप दीक्षित यांनी त्यांची तुलना रस्त्यावरील गुंडाशी केली होती. त्यानंतर या वक्तव्याबाबत त्यांनी आपली माफीही मागितली होती. संदीप दीक्षित यांनी बिपिन रावत यांच्या कार्यशैलीवर टीका करताना त्यांच्या आक्रमक वक्तव्ये करण्यावरून हे वक्तव्य केले होते. "आपले लष्कर सशक्त आहे. त्याने सीमेवर पाकिस्तानला प्रत्येक वेळी चोख प्रत्युत्तर दिले आहे. हे गेल्या 70 वर्षांपासून सुरू आहे. पाकिस्तान कागाळ्या करणे, बाष्कळ बडबड करणे असल्याच गोष्टी करू शकते. पण आपले लष्करप्रमुखही जेव्हा रस्त्यावरील गुंडांप्रमाणे विधाने करतात तेव्हा वाईट वाटते," असे दीक्षित म्हणाले होते.
दरम्यान, आज भाजपाने दीक्षित यांच्या वक्तव्याचा तीव्र शब्दात निषेध करताना काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी यांनी या प्रकरणी माफी मागावी, अशी मागणी केली होती.