दलितांची चिंता भाजपाशिवाय कोणाला नाही - रविशंकर प्रसाद
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 3, 2018 02:12 AM2018-04-03T02:12:19+5:302018-04-03T02:12:19+5:30
भाजपाला जेवढी दलितांची काळजी आहे तेवढी इतर कोणा पक्षाला नाही, असे प्रत्युत्तर केंद्रीय कायदामंत्री रविशंकर प्रसाद यांनी काँग्रेसच्या टीकेनंतर दिले.
- संतोष ठाकूर
नवी दिल्ली - भाजपाला जेवढी दलितांची काळजी आहे तेवढी इतर कोणा पक्षाला नाही, असे प्रत्युत्तर केंद्रीय कायदामंत्री रविशंकर प्रसाद यांनी काँग्रेसच्या टीकेनंतर दिले.
ते म्हणाले, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील सरकारने संधी मिळताच राष्ट्रपतीपदासाठी दलित वर्गातील व्यक्तिलाच निवडले. यापेक्षा चिंता व चिंतनाचे वेगळे कोणते उदाहरण असू शकेल? या प्रश्नावरून चाललेल्या हिंसाचाराचे आम्ही समर्थन करीत नाही. हिंसाचार सोडून चर्चेचा मार्ग स्वीकारावा, असे आवाहन करू, असेही ते म्हणाले. सरकार आपली जबाबदारी पार पाडत आहे. सर्वोच्च न्यायालयाने घेतलेल्या भूमिकेशी आम्ही सहमत नाही, हे आम्ही न्यायालयाला सांगू इच्छितो. म्हणूनच सरकारच्या वतीने आदेशात बदल व सुधारणा करावी अशी मागणी केली जात आहे. भाजपाचे आज सगळ््यात जास्त खासदार, आमदार व लोकप्रतिनिधी दलित समाजाचे आहेत. देशभरात कुठेही भाजपाच्या पदाधिकाऱ्यांच्या यादीत दलित वर्गाला सहजपणे ओळखता येते. असे असताना विरोधकांनी केंद्र सरकारवर आरोप करणे अयोग्यच आहे, असे रविशंकर प्रसाद म्हणाले.
राहुल गांधींची टीका
दलितविरोध हा भाजपा व रा.स्व. संघाच्या डीएनएमध्येच आहे, अशी टीका काँग्रेसचे अध्यक्ष राहुल गांधी यांनी केली आहे. राहुल गांधी म्हणाले की, दलितांनी समाजाच्या तळागाळातच राहिले पाहिजे, असे भाजपा व संघाला वाटते. या भूमिकेला विरोध करणाºयांना हिंसाचार घडवून दडपले जाते. दलित अत्याचारविरोधी कायदा बोथट केल्याच्या निषेधार्थ जे दलित बांधव सोमवारी देशव्यापी बंदच्या निमित्ताने रस्त्यावर उतरले आहेत, त्यांना काँग्रेस सलाम करते.