लोकमत न्यूज नेटवर्कमुंबई : पहिली भारतीय स्पोर्ट्स कार बनविणाऱ्या डीसी डिझाइन्स प्रायव्हेट लिमिटेडचे संस्थापक दिलीप छाब्रिया याला सोमवारी हास्यकलाकार कपिल शर्माची फसवणूक केल्याप्रकरणी अटक झाली. मंगळवारी न्यायालयाने त्याला एक दिवसाची पोलीस कोठडी सुनावली. कपिल शर्मापाठोपाठ आणखी ६ तक्रारदार पुढे आले आहेत.
एकाच चेसिस आणि इंजिन नंबरची वेगवेगळ्या राज्यात अनेकदा नोंदणी, स्वतःच तयार केलेल्या कारवर कर्ज घेऊन स्वतः खरेदी करणे, तसेच एका वाहनावर अनेकदा कर्ज घेणे अशा प्रकारचा डीसी डिझाइन्स प्रायव्हेट लिमिटेड कंपनीचा घोटाळा पोलिसांनी डिसेंबरअखेरीस उघडकीस आणला. कंपनी संचालकांविरुद्ध गुन्हा दाखल करत छाब्रियाला १८ डिसेंबर रोजी अटक केली. दोन वेळा पोलीस कोठडी मिळाल्यानंतर छाब्रियाची रवानगी न्यायालयीन कोठडीत केली. हा तपास सुरू असतानाच व्हेनेटी बस बनवून देतो, असे सांगून छाब्रिया यांनी ५ कोटी ३२ लाख रुपयांना फसविल्याची तक्रार कपिल शर्मा यांनी वर्सोवा पोलिसांत केली हाेती.