पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी घरामध्ये पडल्या आहेत. यामुळे त्यांच्या डोक्याला गंभीर दुखापत झाल्याने त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले. यावर आता भाजपाचे नेते दिलीप घोष यांनी खोचक टोला लगावला आहे. "त्या स्वतःला सिंहीण म्हणवून घेतात आणि स्वतःच्या घरात मांजरीसारख्या राहत आहेत" असं घोष यांनी म्हटलं आहे.
दिलीप घोष म्हणाले की, "जर त्या स्वत:च्याच घरातही सुरक्षित नाहीत, तर मुख्यमंत्री कुठे सुरक्षित राहणार? त्या स्वतःला सिंहीण म्हणवतात आणि स्वत:च्याच घरात मांजरीसारख्या राहत आहेत. त्यांचा त्यांच्या नातेवाईकांवर विश्वास आहे. ममता यांनी कोणत्या प्रकारचं राजकारण केलं आहे? नातेवाईकांसाठी सर्व काही करूनही त्यांना आनंद देण्यात त्या अपयशी ठरल्या आहेत."
एसएसकेएम रुग्णालयाच्या संचालकांनी आपल्या निवेदनात म्हटलं आहे की, मागून ढकलल्यामुळे मुख्यमंत्री पडल्या. मात्र तृणमूल काँग्रेसने हे नाकारलं आहे. पत्रकार परिषदेत टीएमसी नेते आणि राज्यमंत्री शशी पांजा म्हणाले, ममता बॅनर्जी यांना थोडी चक्कर आल्यासारखं वाटलं आणि नंतर त्या खाली पडल्या, त्यांना कोणीही मागून ढकललं नाही.
टीएमसी मंत्री म्हणाले, "पडल्यानंतर त्यांना (मुख्यमंत्री) दुखापत झाली आहे आणि डॉक्टर त्यांची सर्व प्रकारे तपासणी करत आहेत. मेडिकल रिपोर्ट लवकरच समोर येईल. तपास सुरू आहे. सर्वांना ममता बॅनर्जी यांचं चांगलं व्हावं असं वाटत आहे. त्याचा चुकीचा अर्थ काढणे योग्य नाही."
ममता बॅनर्जी गुरुवारी त्यांच्या कालीघाट येथील घरात अचानक पडल्या आणि कपाळाला गंभीर दुखापत झाली. त्यांच्या डोक्याला तीन टाके पडले असून नाकाला दुखापत झाली होती, मात्र मेडिकल टेस्टनंतर त्यांना रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला आहे.