कोलकाता : जिवंत अभिनयाद्वारे कोट्यवधी चाहत्यांचे महानायक ठरलेले दिलीप कुमार हे फुटबॉलचे चाहते होते. कोलकाता येथील प्रसिद्ध मोहम्मेडन स्पोर्टिंग तसेच चुन्नी गोस्वामी यांच्या खेळाचे ‘फॅन’ होते. वयाच्या ९८ व्या वर्षी बुधवारी दीर्घ आजारामुळे दिलीप कुमार यांनी अखेरचा श्वास घेतला.
चुन्नी गोस्वामी यांनी १९६४ ला मुंबईत आंतरराष्ट्रीय सामना खेळल्यानंतर कारकिर्दीला अलविदा केले त्यावेळी खास चाहत्यांनी त्यांना निर्णय बदलण्याची विनंती केली. हे दोन्ही प्रशंसक दिलीप कुमार आणि प्राण हे होते. हे दोघेही गोस्वामी यांचा सामना पाहण्याची एकही संधी सोडत नव्हते. एका फुटबॉल स्पर्धेच्या वेळी ते विरोधी संघाच्या चाहत्यांशी भिडल्याचा किस्सा सर्वश्रुत आहे. १९८० ला झालेल्या रोव्हर्स कप अंतिम सामन्याच्या वेळी दिलीप कुमार मुख्य पाहुणे होते. मोहम्मेडन स्पोर्टिंग आणि ईस्ट बंगाल यांच्यात हा सामना होता. तो किस्सा सांगताना मोहम्मेडनचे कर्णधार व्हिक्टर अंमलराज म्हणाले, ‘त्यावेळी राजकुमार आणि राजेश खन्ना यांचा ‘मर्यादा’ हा चित्रपट हिट झाला होता. विरोधी चाहत्यांनी सामन्यात राजकुमार यांच्या नावाने घोषणा देताच दिलीप साहेब नाराज झाले होते.’
क्रिकेटशौकीन सुपरस्टार!
दिलीप कुमार यांना क्रिकेटचेही वेड होते. संधी मिळेल तेव्हा ते क्रिकेटच्या मैदानावर पोहोचायचे. दिलीप कुमार अशाच एका संस्मरणीय क्रिकेट सामन्याचा भाग झाले होते. हा सामना १९६२ मध्ये झाला होता. दिलीप कुमार आणि राज कपूर हे दोन दिग्गज मैत्रीपूर्ण सामन्यात आमने-सामने आले होते. सिनेमा कामगारांसाठी निधी गोळा करणे, हा या सामन्याचा उद्देश होता. हा सामना राज कपूर संघाने जिंकला.
सामन्यात दिलीप कुमार यांनी राज कपूर यांच्या गोलंदाजीवर शानदार चौकार ठोकले होते. प्रसिद्ध कॉमेडियन आय. एस. जोहर आणि जॉनी वॉकर यांनी आपल्या स्टाईलने सर्वांना हसवले. सामन्याचे समालोचन राज मेहरा यांनी केले होते. हा सामना पाहण्यासाठी हजारो प्रेक्षक स्टेडियमवर पोहोचले होते. मेहमूद, प्राण, शम्मी आणि शशी कपूर, मनोज कुमार, राजेंद्र कुमार, नंदा या कलाकारांनीही जबरदस्त क्रिकेट खेळले होते.