नवी दिल्ली : गेल्या काही दिवसांपासून केंद्र सरकारच्या नव्या कृषी कायद्याविरोधात पंजाब आणि हरयाणाचे शेतकरी दिल्ली सीमेवर आंदोलन करत आहे. या आंदोलनाला पंजाबी गायक आणि अभिनेता दिलजीत दोसांझ याने सुरुवातीपासूनच पाठिंबा दिला आहे. शनिवारी सिंधू सीमेवर त्याने शेतकऱ्यांशी संवाद साधला. यावेळी शेतकऱ्यांना उबदार कपडे विकत घेता यावेत आणि थंडीत रात्री थोडा आराम मिळावा यासाठी दिलजित दोसांझ याने १ कोटी रुपयांची देणगी दिली आहे.
दिलजीत दोसांझ म्हणाला, "आमची केंद्राला फक्त एकच विनंती आहे की, त्यांनी शेतकऱ्यांच्या मागण्या पूर्ण कराव्या. सर्व लोक याठिकाणी शांततेत बसले आहेत आणि संपूर्ण देश शेतकर्यांच्या पाठीशी आहे. तुम्हा सर्वांना माझा नमस्कार, शेतकऱ्यांनी एक नवा इतिहास रचला आहे. हा इतिहास येणाऱ्या पिढ्यांना सांगितला जाईल."
याचबरोबर, "आज मी याठिकाणी बोलण्यासाठी नाही तर ऐकायला आलो आहे. पंजाब आणि हरियाणा येथील शेतकऱ्यांचे आभार. आपण पुन्हा एकदा इतिहास रचला आहे," असे दिलजीत दोसांझ म्हणाला. तसेच, मी मुद्दाम हिंदीत बोलत आहे, जेणेकरून नंतर गुगल करावे लागणार नाही, असे मजेत दिलजीत दोसांझ म्हणाला.
"याठिकाणी शेतकऱ्यांशिवाय दुसरी कोणतीच गोष्ट होत नाही. त्यामुळे हा विषय भरकटवण्याचा प्रयत्न करू नका. शेतकऱ्यांना जे काही हवे आहे, सरकारने त्यांच्या मागण्या मान्य केल्या पाहिजेत. प्रत्येकजण शांततेत बसलेला आहे. कोणत्याही रक्तपाताची चर्चा इथे होत नाही आहे. ट्विटरवर बर्याच गोष्टी बोलल्या जातात आणि विषय भरकटवला जातो," असे दिलजीत दोसांझ याने सांगितले.
दरम्यान, गेल्या काही दिवसांपासून केंद्र सरकारच्या नव्या कृषी कायद्याविरोधात पंजाब आणि हरयाणाचे शेतकरी दिल्ली सीमेवर आंदोलन करत आहे. केंद्र सरकारने संसदेत आणलेले तीन कृषी कायदे रद्द करावे, अशी मागणी शेतकऱ्यांची आहे. याच पार्श्वभूमीवर तोडगा काढण्यासाठी केंद्र सरकार आणि शेतकरी संघटनांची शनिवारी बैठक झाली. मात्र, या बैठकीत शेतकऱ्यांच्या मागणीवर अद्याप पूर्णपणे तोडगा निघाला नसून आता पुढची चर्चा ही ९ डिसेंबरला होणार आहे.