ऑनलाइन लोकमत
मुंबई, दि. 25 - दिवाळीनिमित्त केंद्र सरकारकडून सर्वसामान्यांना स्वस्त डाळींची भेट मिळणार आहे. सणासुदीच्या काळात सर्वसामान्यांना महागाईचे चटके बसू नये, यासाठी सरकारकडून ग्राहकांना हरभरा डाळ 70 रुपये प्रतिकिलो दराने उपलब्ध करुन दिली जाणार आहे. या पार्श्वभूमीवर केंद्र सरकारकडून राज्य सरकारला 700 मेट्रिक टन डाळ उपलब्ध करून देण्यात आली आहे.
सणासुदींच्या तोंडावर डाळींच्या किंमतींनी अव्वाच्या-सव्वा भाव गाठले आहेत. त्यामुळे महागाईपासून सर्वसामान्यांना तात्पुरता
दिलासा मिळावा, यासाठी राज्य सरकारने अल्प दरात डाळ उपलब्ध करुन देण्याचे आश्वासन दिले होते.
मात्र केंद्र सरकारकडून जरी राज्य सरकारला डाळीचा पुरवठा करून देण्यात आला असला तरी ही डाळ बाजारात येण्यासाठी आणखी दोन ते तीन दिवस लागणार असल्याची माहिती मिळत आहे. दरम्यान, मुंबईसह पुणे, नाशिक, औरंगाबाद, अमरावती आणि नागपूरमध्ये खुल्या बाजारात ही डाळ उपलब्ध करुन दिली जाणार आहे. यासंर्भात आज आदेश निघण्याची शक्यता आहे.