बागलकोट : हिजाब, हलाल प्रकरण आणि मंदिराबाहेरील मुस्लिम फळविक्रेत्यांवरील हल्ले अशा अनेक घटनांमुळे सध्या कर्नाटक चर्चेत येत आहे. यातच आता लिंगायत संत डिंगलेश्वर स्वामी यांनी कर्नाटक सरकार धार्मिक संस्था आणि मठांना निधी जारी करण्यासाठी 30 टक्के कमिशन आकारत असल्याचा आरोप केला.
काँग्रेस नेते एस. आर. पाटील यांनी आयोजित केलेल्या एका मेळाव्यात लिंगायत संत डिंगलेश्वर स्वामी बोलत होते. यावेळी ते म्हणाले की, 'सत्ताधारी भाजप केवळ ठेकेदारांकडूनच कमिशन घेत नाही तर धार्मिक संतांकडून 30 टक्के कमिशन घेते.' दरम्यान, डिंगलेश्वर स्वामी यांच्या वक्तव्याने खळबळ उडाली आहे.
दुसरीकडे, लिंगायत संत डिंगलेश्वर स्वामी यांच्या आरोपांवर भाष्य करताना मुख्यमंत्री बसवराज बोम्मई म्हणाले, "मी स्वामीजींना संपूर्ण माहिती देण्याची विनंती करतो. कोणी पैसे दिले, कोणत्या कारणासाठी पेमेंट केले आणि कोणाला पेमेंट केले. आम्ही निश्चितपणे या प्रकरणाची सखोल चौकशी करू. "
दरम्यान, लिंगायत संत डिंगलेश्वर स्वामी यांच्या आरोपावरून काँग्रेसने भाजपवर हल्लाबोल सुरू केला आहे. भाजप स्वतःला धर्माचे रक्षक म्हणवते, परंतु मंदिर आणि मठांना अनुदानासाठी कमिशन घेते. हे लाजीरवाणे आहे, असे काँग्रेसचे नेते आणि माजी मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांनी म्हटले आहे.