नवी दिल्ली - एकापाठोपाठ एक राज्ये पादाक्रांत करत सुटलेल्या भाजपाला रोखण्यासाठी प्रादेशिक पक्षांची मोट बांधण्यासाठी काँग्रेसच्या माजी अध्यक्षा सोनिया गांधी पुढे सरसावल्या आहेत. विविध गटांत विभागलेल्या विरोधी पक्षांना एकत्र आणण्यासाठी सोनिया गांधी यांनी आज दिल्लीती निवासस्थानी मेजवानीचे आयोजन केले होते. या मेजवानीला राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार, नॅशनल काँन्फ्रन्सचे ओमर अब्दुल्ला, द्रमुकच्या नेत्या कनिमोझी, सपाचे रामगोपाल यादव यांच्यासह 17 प्रादेशिक पक्षांचे नेते उपस्थित होते.
पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि भाजपाविरोधात आघाडी करण्यासाठी सोनिया गांधी यांनी सर्व विरोधी पक्ष नेत्यांना भोजनासाठी निमंत्रित केले होते. सोनियांनी बोलावलेल्या या मेजवानीला राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार, बसपा नेते सतीश चंद्र मिश्रा, समाजवादी पक्षाचे नेते रामगोपाल यादव, द्रमुकच्या नेत्या कनिमोझी, राजदचे तेजप्रताप यादव, नॅशनल कॉन्फरन्सचे ओमर अब्दुल्ला, हमचे जीतनराम मांझी, शरद यादव, जेव्हीएमचे बाबूलाल मरांडी, एआययूडीएफचे बद्रुद्दीन अजमल हे उपस्थित होते. राष्ट्रीय लोकशाही आघाडीत (एनडीए) असलेल्या पक्षांनाही त्याचे निमंत्रण देण्यात आले होते. मात्र या मेजवानीमध्ये तृणमूल काँग्रेसच्या अध्यक्षा ममता बॅनर्जी, सपाचे अध्यक्ष अखिलेश यादव आणि बसपाच्या प्रमुख मायावती यांची अनुपस्थिती प्रकर्षाने जाणवली.